बिजनेस
दिशाभूल करणारी जाहिरात प्रसिद्ध ; जॉन्सन ॲण्ड जॉन्सन कंपनीला मोठा दणका

जॉन्सन अँड जॉन्सन कंपनी पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. जॉन्सन कंपनीला लहान मुलांची उत्पादने निर्मिती करण्यास प्रतिबंधित केलेले असताना त्यांच्या इतर उत्पादनांवरही टाच आणण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
औषध असल्याचा दावा करून ग्राहकांची दिशाभूल करणारी जाहिरात प्रसिद्ध केल्याप्रकरणी अन्न आणि औषध प्रशासनाने या कंपनीला सुमारे १६ लाखांचा दंड ठोठावला आहे. आरएसएल-रिहायड्रेट, ओआरएसएल-रेडी तो ड्रिंक इलेट्रोलाइट सोल्युशन, ओआरएसएल-प्लस ए रेडी टू ड्रिंक इलेट्रोलाइट सोल्युशन, ओआरएसएल-एफओएस रेडी टू ड्रिंक इलेट्रोलाइट सोल्युशन या चार पेयांचं उत्पादन जॉन्सन अॅण्ड जॉन्सन कंपनी करते. हे पेय आजारांसाठी वापरले जातात, अशी जाहिरात कंपनीने केली होती.
परंतु, याविषयी अन्न सुरक्षा अधिकारी अरविंद कांडेलकर यांनी कंपनीला नोटीस देऊन सखोल चौकशी केली. या चौकशीअंती कंपनीने खोटी जाहिरात केल्याचं समोर आलं आहे. तसंच, खोटी जाहिरात करून ग्राहकांची दिशाभूल केल्याचे सिद्ध झाले. यावरून चार उत्पादनांविरोधात प्रति चार लाख रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. त्यानुसार, कंपनीला १६ लाखांचा दंड बसला आहे.



