महाराष्ट्र
माऊलींच्या पालखी सोहळ्यात विश्वस्तांचा थयथयाट!

- श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा आजचा मुक्काम हा पुण्यात आहे. उद्या ही पालखी पुण्यातील भवानी पेठेतून पुढे मार्गस्थ होईल. दरम्यान शुक्रवारी रात्री उशिरा जेव्हा ही पालखी मुक्कामी भवानी पेठेतील विठ्ठल मंदिरात दाखल झाली, तेव्हा अनेक पुणेकर भाविक हे दर्शनासाठी याठिकाणी आले होते.
- यावेळी आळंदी देवस्थानाचे ज्येष्ठ विश्वस्त निरंजननाथ योगी यांनी वारकऱ्यांशी गैरवर्तणूक केल्याचे समोर आले असून त्याचा व्हिडिओही माध्यमांवर व्हायरल होत आहे. याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील या मुक्कामी पालखीचे दर्शन घेण्यासाठी येणार असल्याने माध्यमांचे कॅमेरे हे या मंदिरात होते. यावेळी मुख्यमंत्र्यांचा विशेष चित्रीकरणाचा ताफा देखील दाखल झाला.
- अशावेळी मंदिरात गर्दी होणे साहजिक होते. मात्र, मंदिरात संतश्रेष्ठ माऊलींच्या पादुका आत आणताना आळंदी देवस्थानाचे ज्येष्ठ विश्वस्त निरंजननाथ योगी यांनी माध्यमांच्या कॅमेऱ्यांवर विनाकारण आगपाखड करण्यास सुरुवात केली. वास्तविक पोलिस प्रशासनाने निर्धारित केलेल्या जागेवर सगळे थांबलेले असताना या महाशयांनी पोलिसांसोबत माध्यमांच्या कॅमेऱ्यांना अरेरावी करत बाहेर हुसकण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या या कृतीचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले, ज्यानंतर वारकऱ्यांनी संताप व्यक्त केला होता.



