राजकीय
ब्रेकिंग! आम्ही कोणत्याही पक्षासोबत जायला तयार; मात्र…

- गेल्या काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजेच शरद पवारांची राष्ट्रवादी आणि अजित पवारांची राष्ट्रवादी एकत्र येणार अशी चर्चा सुरू आहे. काही कार्यक्रमांमध्ये अजितदादा पवार आणि ज्येष्ठ नेते शरद पवार हे एकाच मंचावर दिसून आल्याने या चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आले होते. पण आता या चर्चांना ब्रेक लागला आहे.
- कारण पिंपरी चिंचवडमधील एका कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी संधीसाधूपणाचे राजकारण आपल्याला प्रोत्साहित करायचे नाही, त्या दिशेने आपल्याला पावले टाकायची नाहीत, असे म्हणत पुतण्याला सोबत न घेण्याच्या चर्चांवर अप्रत्यक्षपणे ठाम मत व्यक्त केले आहे. त्यामुळे आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येण्याच्या चर्चांना स्वतः पवारांनीच पूर्णविराम लावला आहे.
- आज पिंपरी चिंचवडमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी पवार यांनी अजितदादा पवारांच्या राष्ट्रवादीला सोबत घेण्याच्या चर्चांना पूर्णविराम लावत म्हटले की, अनेक लोक वेगळ्या विचाराचे आहेत. कोणी तरी आता म्हणाले, सर्वांना बरोबर घ्या. सर्वांना बरोबर घ्यायला हरकत नाही. पण सर्व म्हणजे कोण? गांधी, नेहरू यांचा विचार आणि फुले, शाहू, आंबेडकरांचा विचार मानत असेल तर त्यांनासोबत घेणे मान्य आहे. पण सत्तेसाठी भाजपासोबत जाऊन बसायचे ही भूमिका कोणी मांडत असेल तर हा काँग्रेसचा विचार नाही. त्यामुळे कोणाशीही संबंध ठेवा. पण भाजपशी संबंध हा काँग्रेसचा विचार असूच शकत नाही. त्यामुळे संधी साधूपणाचे राजकारण प्रोत्साहीत करायचे नाही. त्यादृष्टीने पाऊले टाकायची नाहीत. आम्ही संधीसाधूंसोबत जाणार नाही, असे पवारांकडून थेटपणे सांगण्यात आले.
- तसेच एका विचाराने काम करणाऱ्या संघटनेची गरज आहे. हे संघटन राष्ट्रवादी देऊ शकतो. निवडणुका येतात आणि जातात. पण त्या निवडणुकीत आपण लक्ष दिले पाहिजे, असेही शरद पवार यांनी म्हटले.



