क्राईम
पतीसोबत नवे आयुष्य, विमान प्रवासाचे स्वप्न, एका क्षणात उद्ध्वस्त

- गुजरातमधील अहमदाबाद विमानतळावरून लंडनकडे झेपावणाऱ्या एअर इंडिया फ्लाइटच्या भीषण अपघाताने संपूर्ण देशाला हादरवून गेला आहे. या अपघातात सर्व प्रवाशांचा मृत्यू झाला असून यात राजस्थानमधील एक 21 वर्षीय नवविवाहिता खुशबू हिचाही दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आयुष्यातील पहिल्या विमान प्रवासाचे आणि विदेशात नवऱ्याला भेटण्याचे तिचे स्वप्न अधूरेच राहिले आहे.
- राजस्थानच्या बाळोतरा जिल्ह्यातील अराबा गावातील रहिवासी खुशबू ही नुकतीच विवाहबद्ध झाली होती. तिचे लग्न यावर्षी 18 जानेवारीला जोधपूर जिल्ह्यातील लूणी खाराबेरा गावचे डॉक्टर विपुल यांच्याशी झाले होते. विवाहानंतर काही महिने सासरी आणि माहेरी राहून ती अखेर लंडनला पतीकडे निघाली होती.
- खुशबू ही तिचे वडील आणि चुलत भावासोबत काल अहमदाबाद विमानतळावर पोहोचली होती. एअर इंडिया फ्लाइट AI-171 मधून लंडनला जाण्याचे तिचे स्वप्न होते. मात्र, टेकऑफनंतर विमान काही मिनिटांतच विमान कोसळले आणि त्या अपघातात तिचा दुर्दैवी मृत्यू झाला.
- खुशबूचे वडील मदनसिंह यांनी विमानतळावर मुलीला निरोप देताना एक फोटो काढला होता. तो फोटो त्यांनी आपल्या व्हॉट्सअॅप स्टेटसवर टाकला होता, ज्यावर लिहिले होते – आशीर्वाद खुशबू बेटा, गोइंग टू लंडन. मुलीला विमानात बसवून ते आणि चुलत भाऊ परत गावाकडे निघाले होते. पण वाटेतच अपघाताची बातमी समजताच संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.
- मदनसिंह यांचा गावात मिठाईचा व्यवसाय आहे. खुशबू ही त्यांच्या चार मुलांपैकी सगळ्यात मोठी मुलगी होती. तिच्या मागे दोन बहिणी आणि एक लहान भाऊ आहे. लग्नानंतर काहीच महिन्यांनी लंडनला पतीकडे जाणाऱ्या खुशबूचे अचानक असे जाणे संपूर्ण कुटुंबासाठी असह्य वेदना देणारे ठरले आहे.



