- सोलापूरच्या राजकारणात मोठा भूकंप येण्याची चिन्हे दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी शिंदे गटात प्रवेश केला. त्यानंतर आता कॉंग्रेसचे नेते भगीरथ भालके शिंदे गटाच्या वाटेवर असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर येवून ठेपल्या आहेत. आहे. भालके शिंदे गटासोबत गेल्यास पंढरपुरात कॉंग्रेस आणि खासदार प्रणिती शिंदे यांना मोठा धक्का बसणार आहे.
-
एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील नेते, मंत्री भरत गोगावले पंढरपुरात आले होते. त्यांचा भालके यांनी भेट घेत सत्कार केला. यावेळी भाजपच्या प्रशांत परिचारक यांचे निकटवर्तीय नागेश भोसले सुद्धा उपस्थित होते. त्यामुळे चर्चांना आणखी उधाण आले आहे.
- 2024 च्या विधानसभा निवडणुकीत भालके यांनी काँग्रेसकडून उमेदवारी मिळवून निवडणूक लढवली होती. विशेष म्हणजे, त्यांनी ऐनवेळी शरद पवार गटातून काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. यामुळे महाआघाडीत असंतोष निर्माण झाला. काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी थेट दिल्लीहून त्यांच्यासाठी तिकीट आणले होते, पण ही जागा आधीपासूनच शरद पवार गटाची असल्याने त्यांनी आरोग्यमंत्र्यांचे पुतणे अनिल सावंत यांना रिंगणात उतरवले. या तिरंगी लढतीचा फायदा भाजपचे समाधान आवताडे यांना झाला आणि त्यांचा विजय झाला.
- सलग दोन पराभवानंतर भालके गटामध्ये नाराजीचे वातावरण आहे. तरीसुद्धा काँग्रेस सोडण्याचा अधिकृत निर्णय अद्याप जाहीर करण्यात आलेला नाही, असे त्यांच्या गटाकडून सांगण्यात येत आहे . मात्र, नुकतीच झालेली भालके आणि शिंदे गटाचे नेते गोगावले यांच्यातील भेट नव्या राजकीय चर्चांना उधाण देणारी ठरली आहे.
सोलापूर काँग्रेसमध्ये राजकीय भूकंप?
