क्राईम
व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये ॲड केले अन् करेक्ट कार्यक्रमच करून टाकला

- सध्याच्या आधुनिक युगात ऑनलाइन पद्धतीने होणाऱ्या सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ होताना दिसत आहे. सायबर भामट्यांनी वेगवेगळ्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून लाखो रुपये लुबाडल्याच्या घटना पाहायला मिळतात. मुंबईतील मालाडमधून अशीच एक घटना घडल्याचे वृत्त समोर आले आहे. एका 77 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाची फसव्या शेअर ट्रेडिंग ॲपमार्फत सायबर भामट्यांनी एक कोटी 36 लाख रुपयांची फसवणूक केल्याची बातमी समोर आली आहे.
- या प्रकरणातील पीडित व्यक्ती इनऑर्बिट मॉल परिसराचे रहिवासी असल्याची माहिती मिळाली आहे. फसवणूक झालेली व्यक्ती व्यापारी असून काही वर्षांपूर्वी त्यांनी त्यांचा व्यवसाय बंद केला होता. घरी असताना अचानक त्यांचा नंबर एका अनोळखी व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये जोडण्यात आले. या ग्रुपचे नाव 367 एससी पीएलसी पॉलिसी रडार असल्याची माहिती मिळाली आहे.
- या ग्रुपच्या माध्यमातून ग्रुपमधील व्यक्तींना शेअर ट्रेडिंगबाबत अगदी अचूक माहिती दिली जात होती. अशी माहिती मिळत असल्यामुळे ग्रुपमधील लोकही त्यावर विश्वास ठेवून सतत ती माहिती बघत होते.
- शेअर ट्रेडिंगच्या या व्हॉट्सॲप ग्रुपमधील एका महिलेने तक्रारदाराशी संपर्क साधला. तिने शेअर ट्रेडिंगविषयी सगळी माहिती अगदी योग्य पद्धतीने तक्रारादारास समजावून सांगितली आणि त्या ज्येष्ठ व्यक्तीचाही त्या महिलेच्या बोलण्यावर विश्वास बसला. 16 मे ते 17 जून या कालावधीत त्या सायबर भामट्यांनी तक्रारदाराला एका खात्यावर 36 लाख रुपये भरण्यास सांगितले. ज्येष्ठ व्यक्तीनेही विश्वास ठेवून त्यांनी सांगितलेल्या खात्यावर ती रक्कम पाठवली.
- तक्रारदाराने काही काळानंतर त्यांच्या खात्यात पाठवलेली रक्कम काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, भरलेले पैसे परत काढण्यासाठी तक्रारदाराला नफ्याच्या दहा टक्के रक्कम पुन्हा भरण्यास सांगितली. या सगळ्या प्रकारामुळे शेअर ट्रे़डिंगच्या नावाखाली मोठी फसवणूक झाल्याचे तक्रारदाराला लक्षात आले आणि या प्रकरणाची माहिती लगेच त्यांनी पोलिसांना दिली. याबाबत सायबर पोलिसांनी त्या अनोळखी व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे.



