क्राईम
फुटपाथवर सोडले नवजात बाळ, बाजूला चिठ्ठी, दुधाची बाटली

- राज्यात काल पहाटे घडलेल्या हृदयद्रावक घटनेचा अवघ्या 24 तासांत छडा लावत पोलिसांनी एक महिला आणि एका पुरुषाला ताब्यात घेतले आहे. या दोघांनी आपल्या नवजात मुलीला बास्केटमध्ये ठेवून फुटपाथवर टाकून दिल्याची कबुली दिली असून ही घटना परिसरातील सीसीटीव्ही फुटेजमधून उघडकीस आली आहे.
- घटना काल पनवेल शहरातील तक्का परिसरात सकाळच्या सुमारास घडली. एका झाडाच्या खाली ठेवलेल्या बास्केटमध्ये नागरिकांना नवजात मुलगी दिसली. नागरिकांनी तत्काळ पनवेल पोलिसांना याची माहिती दिली आणि बाळाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. बाळासोबत एक चिठ्ठीही आढळून आली होती, ज्यामध्ये आम्ही मनापासून माफी मागतो. आमच्याकडे दुसरा कोणताही पर्याय नव्हता. या बाळासाठी आम्ही मानसिक आणि आर्थिकदृष्ट्या काहीही करू शकत नाही. त्यामुळे यामध्ये कोणालाही गुंतवू नका. आम्ही जे सहन करत आहोत, ते बाळाच्या नशिबी येऊ नये, हीच इच्छा. तिची काळजी घ्या. एक दिवस आम्ही तिला परत घेऊ, असा माफीनामा लिहला होता.
- पनवेल पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर तात्काळ तपास सुरु करण्यात आला. सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून एका बुरखाधारी महिलेला घटनास्थळी बाळ सोडून जाताना पाहण्यात आले. पोलिसांनी तपास अधिक गतीने राबवत महिलेसह तिच्या पुरुष साथीदाराला शोधून काढले आणि चौकशीसाठी ताब्यात घेतले.
- प्राथमिक चौकशीत समोर आले की, या दोघांमध्ये प्रेमसंबंध होते आणि त्यांच्या संबंधातूनच हे मूल जन्मास आले. मात्र, सामाजिक आणि कौटुंबिक दबाव तसेच आर्थिक अडचणीमुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे कबूल केले. पनवेल पोलिसांनी या दोघांविरोधात भारतीय न्याय संहिता अंतर्गत संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. बाळ सध्या रुग्णालयात सुरक्षित असून त्याच्यावर वैद्यकीय देखरेख ठेवण्यात आली आहे.



