ब्रेकिंग! सोलापूर अग्नितांडव प्रकरणात मोठा आरोप

Admin
4 Min Read
  • सोलापूर :- अक्कलकोट रोड एमआयडीसी परिसरातील सेन्ट्रल कारखान्यास काल पहाटे ३.३० वाजता भीषण आग लागली आणि ही आग आटोक्यात आणण्यासाठी तब्बल १२ तास लागले. या दरम्यान या भीषण आगीत चिमुकल्या दीड वर्षाच्या बाळासह ८ जण आगीत भस्मसात झाले. ही घटना सोलापूरच्या औद्योगिक वसाहतीत काळा दिवस ठरला. आगीत अडकलेल्या लोकांनी मदतीसाठी पहाटे ४ वाजता अग्निशामक दल आणि संबंधित महानगरपालिकेच्या प्रशासनाकडे फोनद्वारे संपर्क केला. मात्र त्या ठिकाणी यंत्रणा घटनास्थळी येण्यासाठी तब्बल एक ते दीड तास विलंब झाला. सुरुवातीला अग्निशामक दलाची गाडी त्यात पाणी नव्हते, ती रिकामी गाडीच होती, ती गाडी परत पाठविल्यानंतर दुसरी गाडी आली त्यात पाण्याचा उच्च दाब नव्हता. अधिकाऱ्यांना सदर घटनेची माहिती मिळूनही तात्काळ घटनास्थळी पोहचू शकले नाही. ही माहिती मला मिळताच मी पोलीस आयुक्त एम.राजकुमार यांच्या निवास्थानी गेलो होतो. मात्र ते परगावी असल्याने त्यांची भेट होऊ शकली नाही, त्यानंतर पालिका आयुक्त डॉ. सचिन ओंबासे यांना याची माहिती दिली. तोपर्यंत वेळ निघून गेली होती. जर पालिकेची आपत्कालीन यंत्रणा सजग आणि सतर्क राहिली असती तर कदाचित ही दुर्दैवी घटना घडली नसती. आग नियंत्रणात आणण्याची संधी गमावल्याने आगीत अडकलेल्या तीन जणांनी आपला जीव वाचवण्याच्या प्रयत्नात असताना जागीच बेशुद्ध झाले. त्यानंतर त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरानी मृत घोषित केले. उर्वरित पाच लोकांना बाहेर काढण्यासाठी पाणी, अग्निशामक दल, तत्सम यंत्रणा कार्यरत राहून प्रयत्न केले. परंतु ते पाच दगावले. 
  • वास्तविक पाहता सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त व संबंधित विभागाचे अधिकारी यांची यंत्रणा याकामी अकार्यक्षम व निष्प्रभ ठरली. त्यामुळे यांना जबाबदार धरण्यात यावे व संबंधित भीषण अग्नीतांडवाची सखोल व निपक्षपाती चौकशी करून या दुर्दैवी घटनेस कारणीभूत असणाऱ्या यंत्रणेवर (भारतीय न्याय संस्था कलम १०० प्रमाणे) सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदविण्यात यावा, अशी मागणी ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार कॉ. नरसय्या आडम (मास्तर) यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केलेली आहे. तसेच मयतांच्या कुटुंबियाप्रती सहानुभूती व्यक्त करत सांत्वन केले. 
  • सोलापुरातील अक्कलकोट रोड औद्योगिक वसाहतीमधील सेंट्रल टेक्सटाईल मिल टॉवेल कारखान्याला शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत मालक आणि कामगार कुटुंबातील एकूण ८ जणांचा मृत्यू झाला आहे. रविवारी पहाटे साडेतीन वाजता आग लागल्यानंतर याची माहिती सुरक्षारक्षकाला समजल्यानंतर त्याने बाजूच्या कारखान्यातील सुरक्षा रक्षकाला सांगून अग्निशामक दलाला कळविले.विलंबाने अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळ आल्या. कारखान्याच्या आतील भागात जाण्यासाठी अरुंद रस्ता असल्यामुळे मोठ्या अडचणी निर्माण झाल्या. तोपर्यंत आग मोठ्या प्रमाणावर भडकली होती. कारखान्याचे मालक उस्मान मन्सूरी तसेच एक कामगार कुटुंबीय असे एकूण ८ जण या कारखान्यात काम करून तेथेच राहत होते. मेहताब बागवान, त्यांची मुलगी हिना वसीम शेख आणि मुलगा सलमान मेहताब बागवान या तीन कामगार कुटुंबातील सदस्यांचे मृतदेह सकाळी बाहेर काढण्यात आले.
  • तर कारखान्याचे मालक उस्मान मन्सूरी यांच्या कुटुंबातील चार व कामगार कुटुंबातील एक अशा ५ जणांचा शोध सुरूच होता. मात्र दुपारी ओळखण्यापलीकडे झालेले कारखान्याचे मालक उस्मान मन्सूरी, त्यांचा नातू अनस ( २६ ), नात सून शिफा मन्सूरी (२४) तसेच नातवाचा मुलगा युसूफ (१) व कामगार मेहताब बागवान यांची पत्नी आयेशा बागवान अशा ५ जणांचे मृतदेह मिळाले. सर्व मृतदेह शासकीय रुग्णालयात आणण्यात आले असून नातेवाईकांची प्रचंड गर्दी झाली.
  •   एमआयडीसीमध्ये असलेल्या कारखान्यामध्ये टॉवेलसह अन्य साहित्य तयार करण्यात येत होते. पहाटे साडेतीन वाजता आग लागल्यामुळे आगीवर लवकर नियंत्रण आणता आले नाही. सोलापूर शहरासह अन्य ठिकाणाहून तसेच एनटीपीसीमधून सुद्धा आगीचे बंब मागविण्यात आले. मोठ्या प्रमाणावर पाणी मारण्यात आले. परंतु आग धूमसतच होती. जवळपास पाच ते सहा तासानंतर आगीवर नियंत्रण आणण्यात यश आले. मात्र आतून ओरडण्यात येत असलेला आवाज तोपर्यंत बंद झाला होता, अशी माहिती अग्निशामक दलाच्या जवानांनी दिली.
Share This Article