महाराष्ट्र

मोदी जाता जाता पाकिस्तानचे चार तुकडे करतील

  • पहलगालमध्ये भीषण दहशतवादी हल्ल्यात 26 पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला. या भ्याड हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव वाढला असून या हल्ल्याला चोख प्रत्यूतर दिले जाईल, असा थेट इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला आहे. एकीकडे केंद्रामध्ये मोदींच्या सुरक्षा दलासोबतच्या बैठका वाढल्या असतानाच ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या सामनामधून सर्वात महत्त्वाचे विधान करण्यात आले आहे.
  • पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला कसा घ्यायचा याबाबत मोदी यांनी तीनही सैन्य दलांना सर्वाधिकार दिले आहेत. पाकिस्तानला मूंहतोड जवाब देण्याची जबाबदारी सशस्त्र दलांना दिली. याबाबतची वेळ आणि लक्ष्य आता सैन्याने ठरवायचे आहे. पाकिस्तानच्या बाबतीत काय करायचे याचा निर्णय राजकीय इच्छाशक्तीनुसार मोदींना घेता आला असता. एकतर मोदी हे पंतप्रधान आहेत. पाकिस्तानला धडा शिकवण्याची भाषा ते सातत्याने करीत आहेत. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह हेसुद्धा पाकड्यांच्या बाबतीत आक्रमक आहेत व पाकिस्तानच्या घरात घुसून मारण्याच्या बाबतीत त्यांचे मत ठाम आहे, पण निर्णय घेण्याची वेळ आली तेव्हा भारतीय सैन्याला मोकळीक दिल्याचे स्पष्ट केले, असे या अग्रलेखामध्ये म्हटले आहे.
  • बांगलादेशच्या स्वातंत्र्यासाठी आपण सत्याग्रह केला व त्यासाठी तुरुंगातही गेल्याचा खुलासा खुद्द मोदी यांनी मागे केला आहे. म्हणजे मोदी यांना देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्रत्यक्ष युद्धात सहभागी होण्याचा अनुभव आहे. पाकबरोबरच्या युद्धात मोदी यांचा हा अनुभव कामी येईल. बांगलादेश युद्धाच्या वेळी मोदी 20-22 वर्षांचे असतील. आता ते 75 वर्षांचे आहेत. म्हणजे राजकीय निवृत्तीच्या उंबरठ्यावर आहेत. जाता जाता ते उरलेल्या पाकिस्तानचे चार तुकडे करून इतिहासात अमर होतील. त्यामुळे मोदी यांच्या पाठीशी सगळ्यांनी उभे राहायला हवे, असे सर्वात मोठे आवाहनही सामनामधून करण्यात आले आहे.

Related Articles

Back to top button