राज्यात पुन्हा हत्याकांडाचा थरार!

राज्यातून मोठी बातमी समोर आली आहे. पैशाच्या वादातून मामानेच आपल्या दोन्ही भाच्यांचा चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात एका भाच्याचा घटनास्थळावरच मृत्यू झाला तर दुसऱ्यावर मेयो रुग्णालयात उपचार सुरू असताना पहाटे चार वाजताच्या सुमारास त्याचाही मृत्यू झाला. ही थरारक घटना नागपूर येथे काल मध्यरात्रीच्या सुमारास तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीत अंतर्गत काली माता मंदिरासमोर गांधीबाग येथे घडली.
रवी राठोड आणि दीपक राठोड असे मृत्यू झालेल्या भाच्याची नावे आहेत. बदनसिंग राठोड असे आरोपी मामाचे नाव आहे. भर रस्त्यावर झालेल्या हत्याकांडामुळे शहरातील कायदा व सुव्यवस्था पुन्हा बिघडल्याचे चित्र दिसत आहे. तहसील पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रवी व दीपक राठोड हे सख्खे भाऊ आहेत. दोघेही हंसापुरी भागात राहतात. त्यांचा बांगड्या विक्रीचा व्यवसाय आहे. मागील काही दिवसांपासून त्यांचा आपला मामा बदनसिंग सोबत पैशाच्या व्यवहारातून वाद सुरू होता.
पैसे देत नसल्यामुळे मामा चिडून होता. काल मध्यरात्री १२ वाजताच्या सुमारास मामाने आपला गांधीबागमध्ये भाचा रवीवर चाकूने जीवघेणा हल्ला केला. मामाचा अवतार बघून आपल्या भावाला वाचविण्यासाठी दीपकने धाव घेतली.
मामाने त्याच्यावरही चाकूने हल्ला केला. दीपकला गंभीर जखमी अवस्थेत पोलिसांनी रुग्णालयात दाखल केले. मात्र दीपकचाही पहाटे चार वाजताच्या सुमारास मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच तहसील पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप बुवा ताफ्यासह घटनास्थळी पोहोचले. दरम्यान, पोलीसांनी आरोपी बदनसिंगला ताब्यात घेतले आहे.