सोलापूर येथील प्रसिद्ध न्यूरोलॉजिस्ट डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्या प्रकरणात दररोज नवनवी माहिती समोर येत असून आता अटकेत असलेल्या प्रशासकीय अधिकारी मनीषा मुसळे-माने यांच्या वकिलांनी पोलिसांच्या तपासावर आणि विशेषतः कथित सुसाईड नोटच्या सापडण्याबाबत गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे, ज्यामुळे प्रकरणाला वेगळी कलाटणी मिळण्याची शक्यता आहे.
माने यांचे वकील, अॅड. प्रशांत नवगिरे यांनी न्यायालयात आणि माध्यमांसमोर महत्त्वाचा मुद्दा मांडला आहे. ते म्हणाले, डॉ. शिरीष वळसंगकर यांनी ज्या ठिकाणी आत्महत्या केली, त्या जागेचा पोलिसांनी रितसर पंचनामा केला होता. त्यावेळी पोलिसांना कोणतीही चिठ्ठी कशी काय सापडली नाही? मात्र, नंतर शवविच्छेदनादरम्यान डॉक्टरांच्या कपड्यात चिठ्ठी सापडल्याचे सांगितले जात आहे. पंचनाम्यात न सापडलेली चिठ्ठी शवविच्छेदनावेळी अचानक कशी सापडली? हा सर्व प्रकार केवळ माझ्या पक्षकाराला, माने यांना या प्रकरणात गोवण्यासाठी रचलेला कट असू शकतो, असा गंभीर आरोप अॅड. नवगिरे यांनी केला आहे.
मनीषा मुसळे-माने या २००८ सालापासून डॉ. वळसंगकर यांच्या एसपी न्यूरोसायन्स हॉस्पिटलमध्ये अत्यंत विश्वासू म्हणून कार्यरत होत्या. किंबहुना, त्या डॉ. वळसंगकर यांच्या मानसकन्या मानल्या जात होत्या, अशीही माहिती आहे. असे असताना केवळ मनीषा यांनी पाठवलेल्या एका ई-मेलच्या आधारावर त्यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त करण्यासारखा गंभीर आरोप लावण्यात आला आहे, जो पूर्णपणे चुकीचा आहे, असा दावाही अॅड. नवगिरे यांनी केला आहे.