क्राईम
डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरणात वेगळीच वस्तुस्थिती

- सोलापुरातील सुप्रसिद्ध मेंदूरोग तज्ञ डॉ. शिरीष वळसंगकर स्वत:वर गोळी झाडून जीवन संपवले होते. दरम्यान डॉ. वळसंगकर यांनी आत्महत्येपूर्वी लिहून ठेवलेल्या सुसाईड नोटमध्ये एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. कारण यामध्ये एका महिलेचे नाव समोर आले आहे. या महिलेची ओळख देखील पटली असून वळसंगकर यांनी या महिलेमुळेच आत्महत्या केल्याचे लिहिले आहे. त्यामुळे आता या महिले विरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- मनीषा मुसळे- माने असे या महिलेचे नाव आहे. ही महिला डॉ. वळसंगकर यांच्या हॉस्पिटलमध्ये प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करत होत्या. त्यांच्याकडून रूग्णांकडून येणारे बिल ही कोणतीही नोंद न करता स्विकारली जात होती. ही गोष्ट डॉ. वळसंगकरांना खटकल्याने त्यांनी ही रक्कम स्विकारणाऱ्या महिलेला कामावरून काढून टाकले होते. मात्र तिने वळसंगकरांना आत्महत्येची धमकी दिली होती. मात्र, डॉ. वळसंगकरांना रूग्णालयाचे सर्व व्यवहार कागदोपत्री हवे होते. प्रशासनाकडून हे केले जात नसल्याने डॉ. वळसंगकर तणावाखाली होते. त्यातूनच त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असल्याचे सांगितले जात आहे.
- दरम्यान आरोपी मनीषा माने यांचे वकील प्रशांत नवगिरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी नवगिरे म्हणाले, १७ तारखेला आरोपी महिलेने एक मेल डॉ. शिरीष वळसंगकर यांना केला होता. त्यामध्ये महिलेने असे सांगितले होते की, माझी पगार कपात केली जात आहे. काही व्यक्तींचे ऐकून त्याच्यावर आरोप केले जातात. अधिकार कमी केले जात आहेत. या संदर्भात तिने तक्रार केली होती.
- या मेलच्या अनुषंगाने डॉक्टरांनी दुसऱ्या दिवशी तिला बोलावून घेतले होते. त्यावेळी महिलेने मेल करून चूक झाल्याची कबुली दिली. त्यावेळी माफी देखील मागितली होती. त्यानंतर डॉक्टरांनी राहत्या घरात आत्महत्या केल्याचे एफआयआरमध्ये नोंद आहे. महिला एवढी त्रास देणारी होती तर निश्चितच त्याच दिवशी तिला बोलावण्यात देखील आले नसते, असे नवगिरे यांनी म्हटले.
- डॉक्टरांची चिठ्ठी जप्त झाली आहे. त्यातील हस्ताक्षर नमुने घेऊन तपासाला पाठवायचे आहेत, असे मत पोलिसांनी कोर्टासमोर मांडले. प्रख्यात मेंदूरोग तज्ज्ञ असणारे डॉक्टर या कारणामुळे आत्महत्या करणे शक्य नाही. या प्रकरणात वस्तुस्थिती वेगळी असून ते बाहेर येऊ नये यासाठीच मनीषा माने यांच्यावर खोटी केस करण्यात आली आहे, असा युक्तिवाद आम्ही मांडला आहे, असे नवगिरे यांनी सांगितले.



