क्राईम

ब्रेकिंग! 26/11 च्या हल्ल्यात दाऊद इब्राहिमचा हात?

  • 2008 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वूर हुसेन राणा याची राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) चौकशी करत आहे. हल्ल्याच्या कटात त्याच्या भूमिकेसोबतच एनआयए आता हल्ल्याच्या पडद्यामागे असलेल्या लोकांना शोधण्याचा प्रयत्न करत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सलग दुसऱ्या दिवशी राणा याची चौकशी करण्यात आली. तपास यंत्रणा राणाचे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि त्याच्या नेटवर्क ‘डी कंपनी’शी असलेल्या संबंधांची देखील बारकाईने चौकशी करत आहे.
  • हल्ल्याचे नियोजन आणि त्यात सहभागी असलेल्या इतरांची खात्री करण्यासाठी राणा आणि डेव्हिड हेडली यांच्यातील कॉल्सचे रेकॉर्डिंग स्कॅन केले जात असल्याची माहिती सूत्रांनी पीटीआयला दिली आहे.
  • हेडलीच्या सूचनेवरून राणा ज्या दुबईस्थित व्यक्तीला भेटला होता, त्याबद्दल एनआयएला एक महत्त्वाचा सुगावा लागला आहे. या व्यक्तीला हल्ल्याच्या योजनेची माहिती होती, असे समजते. ही व्यक्ती दाऊद इब्राहिम किंवा डी कंपनीशी संबंधित होती का? याचाही तपास एजन्सी करत आहे. राणाचे पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआय आणि दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबा (एलईटी) शी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संबंध होते का? याचाही एनआयए तपास करत आहे. मुंबई हल्ल्याचे नियोजन 2005 च्या सुमारास सुरू झाले होते, असे तपासकर्त्यांचे मत आहे.
  • तपासात मदत करण्यासाठी राणाच्या नवीन आवाजाचे नमुने घेण्यात आले आहेत. ते हल्ल्यानंतर लगेच केलेल्या कॉलशी जुळवण्यासाठी पाठवण्यात आले आहेत. हल्ल्यांपूर्वी राणा भारताच्या अनेक भागांना भेट देऊन गेला असावा, तिथे त्याने कटात महत्त्वाची भूमिका बजावली असावी, असा संशय एजन्सीला आहे.
  • 26 नोव्हेंबर 2008 रोजी पाकिस्तानातून दहा दहशतवादी समुद्री मार्गाने मुंबईत पोहोचले. त्यांनी ताज हॉटेल, सीएसटी स्टेशन, नरिमन हाऊससह अनेक ठिकाणी हल्ला केला.
  • हा हल्ला तीन दिवस चालला. त्यात 166 लोक मृत्युमुखी पडले, तर 230 हून अधिक जण जखमी झाले. आता तहव्वुर राणा भारताच्या ताब्यात आहे. या भयानक हल्ल्याच्या कटात सहभागी असलेल्या प्रत्येकाची ओळख पटवून न्यायाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल उचलले जाईल, अशी माहिती मिळत आहे.

Related Articles

Back to top button