राजकीय
चला आपण एकत्र येऊ!

- माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि भाजप एकत्र येणार अशी चर्चा राज्यात रंगली होती. देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव यांची गुप्त भेट घेतल्याची बातमीही समोर आली. त्यामुळे उद्धव यांच्या मनात नेमके काय सुरू आहे याची चर्चा सुरू झाली होती. आता तर उद्धव यांनी चक्क भाजप कार्यकर्त्यांना साद घालत, चला आपण एकत्र येवू असे आवाहन केले आहे.
- त्यांच्या या आवाहनानंतर सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. हे घडले आहे ते सिल्लोडमध्ये. सिल्लोड इथं झालेल्या जाहीर सभेत उद्धव यांनी भाजप कार्यकर्त्यांना एकत्र येण्याचे आवाहन केले. या मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे अब्दुल सत्तार निवडणूक लढवत आहेत. त्यांना पराभूत करण्यासाठी ठाकरेंनी थेट भाजप कार्यकर्त्यांनाच गळ घातली.
- सिल्लोड विधानसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाकडून सुरेश बनकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांची लढत अब्दुल सत्तार यांच्याबरोबर आहे. बनकर हे मुळचे भाजपचे आहेत. भाजप आणि सत्तार यांच्यात या मतदारसंघात नेहमीच संघर्ष राहीला आहे. सत्तार महायुतीत असल्यामुळे ही जागा भाजपला सुटणे अवघड होते. त्यामुळे बनकर यांनी भाजपला रामराम करत ठाकरेंची मशाल हाती घेतली आहे. त्यामुळे बनकरांना ठाकरे गट, काँग्रेस, राष्ट्रवादी बरोबर भाजपच्याही कार्यकर्त्यांचे समर्थन मिळणार आहे.
- हाच धागा पकडत उद्धव यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना साद घातली आहे. तुमचा सत्तारांबरोबर नेहमीच संघर्ष राहीला आहे. त्यांची दादागिरी आणि गुंडगिरी तुम्हाला मान्य आहे का? अशा गद्दाराला तुम्ही पुन्हा निवडून देणार आहात का? भाजपचा जो सच्चा कार्यकर्ता आहे, तो कधीही सत्तार यांना मतदान करणार नाही.
- त्यामुळे चला आपण एकत्र येवून ही गुंडागर्दी मोडून काढू. त्यानंतर पुढे काय करायचे ते पाहू. पण इथं एकत्र येवून या गद्दाराला गाडू, असे आवाहन त्यांनी भाजप कार्यकर्त्यांना केले. या गद्दाराला पाडा, असे आवाहन करत सत्ता आल्यानंतर चौकशी करून या गद्दाराला जेलमध्ये टाकू, असे उद्धव म्हणाले.



