गर्भवती मृत्यू प्रकरणात अपडेट, आरोग्य विभागाचा मोठा निर्णय

पुण्यातील प्रसिद्ध दीनानाथ मंगशेकर रुग्णालयाने केलेल्या आडमुठेपणामुळे एका गर्भवतीला आपला जीव गमवावा लागला आहे. तनिषा भिसे असे मृत महिलेचे नाव असून ती भाजपचे आमदार अमित गोरखे यांचे पीए सुशांत भिसे यांची पत्नी आहे. तनिषा यांना डिलिव्हरीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
मात्र रूग्णालय प्रशासनाने महिलेच्या कुटुंबियांना तातडीने दहा लाख रूपये भरण्यास सांगितले. महिलेच्या कुटुंबाने तीन लाख भरण्याची तयारी दाखवली, पण दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने गर्भवतीला प्रवेश नाकारला. त्यामुळे दुसऱ्या रूग्णालयात जाऊन तनिषा यांची डिलिव्हरी करण्यात आली. त्यांनी दोन मुलींना जन्म दिला, मात्र ऐनवेळी झालेल्या धावपळीमुळे त्यांना आपला जीव गमवावा लागला.
याप्रकरणी राज्यभरातून संताप व्यक्त होताना दिसत आहे. अशातच आता आरोग्य विभागालाही जाग आली. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे ऑडिट करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे.
या समितीसाठी पाच प्रशासकीय कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. मंगेशकर रुग्णालयाचा योग्यरित्या अहवाल सादर करण्याचे आदेश आरोग्य विभागाकडून देण्यात आले आहे. तसेच समितीचे सदस्य आणि अध्यक्ष स्वतः दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये जाऊन चौकशी करणार आहेत याबाबत ऑडिट रिपोर्ट चौकशी केल्यानंतर सादर केला जाणार आहे.