ऐ गौरी, माझ्याशी का भांडलीस?, राकेश रात्रभर मृतदेहाशी बोलत बसला

कर्नाटकमधील बंगळुरु शहरात झालेल्या गौरी खेडेकर हत्या प्रकरणाने खळबळ उडाली आहे. ३२ वर्षीय गौरीचा मृतदेह तिच्याच घरातील एका सुटकेसमध्ये आढळून आला होता. या प्रकरणी तिचा पती राकेश खेडेकर याला बंगळुरु पोलिसांनी महाराष्ट्रातील पुणे येथून अटक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, आरोपी राकेशनेच गुन्हा केल्यानंतर घर मालकाला फोन करून आपण पत्नीचा खून केल्याची माहिती दिली होती.
घर मालकाकडून माहिती मिळताच हुलिमावू पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी फ्लॅटचा दरवाजा उघडून आत तपासणी केली असता त्यांना एका सुटकेसमध्ये गौरीचा मृतदेह आढळून आला. पोलीस उपायुक्त सारा फातिमा यांनी दिलेल्या माहितीनुसार, गौरीच्या मृतदेहावर चाकूने वार केल्याच्या अनेक खुणा (व्रण) आहेत.
गौरीचा मृत्यू झाल्यानंतर राकेश रात्रभर तिच्या मृतदेहाजवळ बसून बोलत होता. तपास अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, तो तिला सतत प्रश्न विचारत होता की, ऐ गौरी, माझ्याशी का भांडलीस?.
बंगळुरु पोलिसांनी आरोपी पती राकेश याला पुण्यातून अटक केली असून त्याला पुढील तपासासाठी बंगळुरूला आणण्यात येत आहे. ही हत्या नेमकी कोणत्या कारणावरून करण्यात आली, याचा खुलासा अद्याप झालेला नाही. पती-पत्नीमधील वादातून हे कृत्य घडले असावे, असा प्राथमिक अंदाज असला तरी पोलीस सखोल तपास करत असून त्यानंतरच हत्येमागील नेमके कारण स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले.



