दिशा सालियन मृत्यू प्रकरणावरुन आज विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात चांगलाच वाद रंगला. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांविरोधात आक्रमक झाले. दिशा सालियन प्रकरणावरुन सत्ताधारी हे ठाकरे गटाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरेंविरोधात बाह्या सरसावून उभे होते. सत्ताधारी आणि विरोधकांत जोरदार खडाजंगी झाली. सत्ताधारी आदित्य ठाकरेंना लक्ष करत आहेत. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळातील मंत्री मात्र आदित्य ठाकरेंच्या बाजून समोर आले. केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी आदित्य ठाकरेंची बाजू घेतली. दिशावर सामूहिक अत्याचार करुन तिचा खून करण्यात आल्याचा आरोप तिच्या आई-वडिलांनी केला आहे. या प्रकरणात आदित्य ठाकरेंचा सहभाग असेल, असे अजिबात वाटत नाही, असे आठवले म्हणाले. मात्र तिच्या आई-वडिलांनी केलेल्या तक्रारीची निष्पक्ष चौकशी होणे गरजेचे आहे, असेही आठवले म्हणाले.
आठवले म्हणाले की, या प्रकरणाची उध्दव ठाकरे यांचे सरकार असताना चर्चा झाली होती. आदित्य यांचा यामध्ये समावेश आहे की नाही, याबाबत मला माहिती नाही. आदित्य यांना या प्रकरणात टार्गेट करण्याची आमची भूमिका नाही. परंतु दिशा हिच्या आई वडिलांनी केलेल्या तक्रारीवर या प्रकरणातील चौकशी होणे गरजेचे आहे. या प्रकरणात आदित्य यांचा समावेश असेल, असे मला अजिबात वाटत नाही.