भारत हरणार असे म्हणणाऱ्या ‘आयआयटी बाबा’ला न्यूज चॅनेलमध्ये मारहाण

महाकुंभ मेळ्यातील एका व्हीडिओमुळे ‘आयआयटी बाबा’ नावाने ओळखले जाणारे अभय सिंग लोकप्रिय झाले होते. उच्च-शिक्षित असूनही अशाप्रकार संन्यासी अवस्थेत पोहोचल्याने याची बरीच चर्चा रंगली होती.
दरम्यान नोएडामध्ये एका खाजगी न्यूज चॅनेलच्या कार्यक्रमात त्यांच्यासोबत कथितरित्या मारहाण झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. आयआयटी बाबा आणि काही साधू-संतांमध्ये झालेल्या हाणामारीचा एक व्हीडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रिपोर्टनुसार, ‘आयआयटी बाबा’ला मुलाखतीसाठी एका खासगी न्यूज चॅनेलने आमंत्रित केले होते. आयआयटी बाबांनी आरोप केले आहे की, मुलाखतीवेळी उपस्थित मीडिया कर्मचाऱ्यांनी गैरवर्तन केले. यावेळी भगवे वस्त्र परिधान केलेले काही लोक बाहेरून आले व त्यांनी मारहाण केली. तसेच जबरदस्ती एका खोलीत बंद करण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी स्वामी वेदमूर्ती नंद सरस्वती नावाच्या एका व्यक्तीने दांड्याने मारहाण केली.
या घटनेनंतर आयआयटी बाबा थेट सेक्टर 126 मधील पोलिस चौकीच्या बाहेर बसले. मात्र, पोलिसांनी समजून घातल्यानंतर त्यांनी पुढे कोणतीही तक्रार दाखल केली नाही. दरम्यान, प्रयागराज येथे आयोजित करण्यात आलेल्या महाकुंभ मेळ्यातील एका व्हीडिओमुळे ‘आयआयटी बाबा’ चर्चेत आले होते. त्यानंतर चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेतील भारत-पाक सामन्याबाबत त्यांनी केलेल्या भविष्यवाणीचीही चर्चा रंगली होती. पाकिस्तानविरुद्ध भारत हरणार, असे भाकीत त्यांनी केले होते.



