मनोरंजन

पडद्यावर दिसणाऱ्या औरंग्यावर हल्लाबोल

सोलापूरसह अन्य भागात ‘छावा’ चित्रपटाला जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाचे सर्व शो फुल्ल आहेत. या सिनेमात औरंग्याने छत्रपती संभाजी महाराजांवर केलेल्या अत्याचाराचे दृश्य दाखविण्यात आले आहे. हा सीन पाहून कित्येक प्रेक्षक सुन्न पडल्याचे पहायला मिळाले. दरम्यान, गुजरातमधील भरूचमध्ये एक अशी घटना घडली ज्याचा कुणी विचारही केला नसेल. हा सीन पाहताना एका प्रेक्षकाला त्याचा राग अनावर झाला आणि त्याने थेट सिनेमा थिएटरचा पडदाच फाडला.

रविवारी आरके सिनेमा येथे रात्री 11.45 चा शो सुरू असताना एका प्रेक्षकाने सिनेगृहाचा पडदा फाडला. उपस्थित प्रेक्षकांनी या घटनेचा व्हिडीओ चित्रीत केला आणि सोशल मीडियावर शेअर केला.

हा व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होताना दिसतोय. थिएटरमध्ये गोंधळ सुरू झाला आणि या प्रेक्षकाला पोलिसांनी ताब्यात घेतले. सदर घटना सिनेमातील औरंगजेब छत्रपती संभाजी महाराजांचा छळ करतानाचा सीन सुरू असताना घडली. सिनेमातील दृश्य पाहून प्रेक्षकाला राग अनावर झाला आणि त्याने सिनेगृहाचा थेट पडदाच फाडून टाकला.

घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी या घटनेबाबत माहिती देताना सांगितले, आरोपीचे नाव जयेश वसावा असे आहे. सिनेमात शेवटचा सीन सुरू झाला तेव्हा तो पडद्याजवळ धावत गेला आणि तेथे असलेल्या अग्निशामक यंत्राचा वापर करून त्याने पडद्याचे नुकसान केले. मल्टिप्लेक्सचे कर्मचारी त्याच्याकडे धावत येईपर्यंत तो पडद्याचे नुकसान करत होता.

याविषयी बोलताना भरूच अ विभागाचे पोलीस अधिकारी म्हणाले, सिनेमाच्या शेवटी छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेबाने कैद केल्याचे दाखवले आहे. त्यानंतर औरंगजेब महाराजांचा छळ करताना दिसतो. यावेळी सदर आरोपी संतापला आणि त्याने पडद्यावर दिसणाऱ्या औरंगजेबावर हल्ला केला. परिणामी थिएटरच्या पडद्याचे नुकसान झाले. याप्रकरणी आरोपीवर भारतीय न्याय संहिता कायद्याच्या विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Articles

Back to top button