राज्यात राजकीय भूकंप!

राज्याच्या राजकारणात आज एक मोठी घडामोड घडली आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्य सरकारविरोधात मोर्चा उघडलेल्या मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांची राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी आज पहाटे आंतरवाली सराटीत भेट घेतली. सरपंचांच्या घरी वीस मिनिटे चर्चा झाल्याची माहिती जरांगे यांनी दिली. शेतकऱ्यांचे प्रश्न आणि मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा झाली, अशी माहिती जरांगे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
कृषिमंत्री मुंडे यांनी तुमची भेट घेतली. या भेटीत कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. त्यावर जरांगे म्हणाले, पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास ते आले होते. त्यावेळी मी झोपेतच होतो. भेट झाली. आम्हा दोघांत साधारण वीस मिनिटे चर्चा झाली. शेतकऱ्यांचे प्रश्न आणि मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा झाली. आंतरवालीत कुणीही येऊ शकतो. आमच्याकडे मैदान आहे. आम्हाला कोणतीच तयारी करण्याची गरज नाही. आता त्यांनी उद्या जरी निवडणूक घेतली तरी आमची तयारी आहे.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीत महायुतीला राज्यात मोठा फटका बसला होता. राज्यातील अनेक मतदारसंघात मराठा आंदोलनाचा परिणाम झाल्याचे दिसून आले. आता विधानसभेलाही याचा फटका बसू शकतो याची जाणीव असल्याने महायुती सरकारने मराठा आंदोलकांचा रोष कमी करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून मंत्री मुंडे यांनी जरांगेंची भेट घेतल्याची चर्चा सुरू झाली आहे.