कोण आहेत मोहिनी दत्ता?

दिग्गज उद्योगपती रतन टाटा यांच्या संपत्तीमधील जवळपास एक तृतीयांश हिस्सा एका अशा व्यक्तीला मिळणार आहे, ज्याबाबत फारशी कुणाला माहिती नाही. रतन टाटांचे 9 ऑक्टोबर 2024 रोजी निधन झाले. त्यांच्या मृत्यूपत्राची माहिती समोर आली आहे. त्यानुसार टाटा यांनी जवळपास पाचशे कोटींची संपत्ती मोहिनी मोहन दत्ता यांच्या नावावर केली आहे. त्यानंतर मोहिनी दत्ता कोण आहेत? ही चर्चा सुरु झाली आहे.
रतन टाटांच्या मृत्यूपत्रात मोहिनी मोहन दत्ता यांचे नाव आहे. टाटांनी त्यांच्या उत्तराधिकाऱ्यांमध्ये त्यांचा समावेश केला आहे. प्रोबेटचा कालावधी संपल्यानंतर आणि हायकोर्टाने प्रमाणित केल्यानंतरच त्यांना ही संपत्ती मिळणार आहे. त्यासाठी किमान सहा महिने कालावधी लागू शकतो.
मोहिनी मोहन दत्ता हे जमशेदपूरचे उद्योजक आहे. ते स्टॅलियन कंपनीचे सहमालक आहेत. त्यानंतर ते टाटा सर्व्हिसेसचा भाग बनले. विलिनीकरणाच्या पूर्वी त्यांच्याकडे स्टॅलियनचे 80 टक्के समभाग होते. तर टाटा इंडस्ट्रीकडून 20 टक्के समभाग होते. आपली रतन टाटांची पहिली भेट जमेशदपूरमधील डिलर्स हॉस्पिटलमध्ये झाली होती, त्यावेळी मी फक्त 24 वर्षांचा होतो, अशी माहिती मोहिनी दत्ता यांनी दिली आहे.
टाटा समुहाच्या अंतर्गत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आपण टाटा कुटुंबीयांचे जवळचे आहोत, असे दत्ता नेहमी सांगत. टाटांनी आपल्याला मदत केली आणि त्यांना प्रशिक्षित केले, असे दत्ता यांनी काही दिवसांपूर्वी मीडियाशी बोलताना सांगितले होते. फॉर्च्युनच्या रिपोर्टनुसारल मोहिनी मोहन दत्ता यांची मुलगी टाटा ग्रुपमध्ये कार्यरत होती. त्या 2015 पर्यंत ताज हॉटेलमध्ये तर 2024 पर्यंत टाटा ट्रस्टमध्ये काम करत होत्या.



