राज्यात पुन्हा राजकीय भूकंप! ठाकरे गटाला खिंडार पडणार

राज्याच्या पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ठाकरे गटाचे सहा खासदार शिंदे गटाच्या संपर्कात असल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू आहे. पण पक्षांतर बंदी कायद्यामुळे या खासदारांचे तळ्यात मळ्यात सुरू होते. या कायद्यातून वाचण्यासाठी ठाकरे गटाचे ९ पैकी सहा खासदार फुटणे आवश्यक होते. त्यामुळे खासदाराचे मन वळवण्यासाठी वेळ घेण्यात आली.
ऑपरेश टायगर सक्सेसफुल झाले आहे. आता ठाकरे गटाच्या सहा खासदारांचे मन वळवण्यात शिंदे गटाला यश आले असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे शिंदे गट पुन्हा ठाकरे गटाला तगडा झटका देण्याच्या तयारीमध्ये असल्याची चर्चा सुरू झाली आहे. ठाकरे गटाचे सहा खासदार येत्या संसदेच्या अधिवेशनाच्या आधी शिंदे गटामध्ये प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे.
महायुतीचे मजबूत सरकार असल्याने अनेक खासदारांना भविष्याची चिंता आहे. खासदारांना मतदारसंघासाठी निधी मिळवण्यातही अडचणी येत आहेत. केंद्रात आणि राज्यात दोन्हीकडे महायुतीचे सरकार असल्याने त्याचा फायदा खासदारांना होईल. एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेला विधानसभेत जनतेने स्वीकारले आहे. अशा अनेक कारणांमुळे ठाकरे गटाचे खासदार हे उद्धव ठाकरेंची साथ सोडू शकतात.



