महाराष्ट्र

राज्यात मुसळधार पावसाने घेतला 21 जणांचा बळी

राज्यात मागील काही दिवसांपासून पावसाने धुमाकूळ घातला आहे. 15 ते 19 ऑगस्ट दरम्यान झालेल्या मुसळधार पावसामुळे राज्यात 21 जणांचा मृत्यू झाला आहे आणि दहा जण जखमी झाले आहेत, अशी माहिती सरकारकडून देण्यात आली आहे.

15 ऑगस्ट ते 19 ऑगस्ट या कालावधीत राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये नैसर्गिक आपत्ती आणि दुर्घटनेमुळे जीवितहानी व वित्तहानी झाली आहे. या काळात एकूण 21 जणांचा आणि 12 प्राण्यांचा मृत्यू झाला आहे.

नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक जीवितहानी झाली असून पुराच्या पाण्यात वाहून जाणे, वीज पडून आणि भिंत कोसळून अनेक घटना घडल्या. यामध्ये सात जणांचा मृत्यू झाला आहे. नांदेडच्या मुखेड तालुक्यात ढगफुटी नंतरची विदारक परिस्थिती समोर आली आहे. शेतकरी, शेत मजुरांची घरे पूर्णपणे उद्धवस्त झाली आहेत. त्यामुळे महिलांना अश्रू अनावर झाले. मुंबई शहर आणि उपनगर येथे घर आणि भिंत कोसळण्याच्या घटनांमध्ये जीवितहानी झाली. वाशिम, यवतमाळ आणि जळगाव या जिल्ह्यांमध्ये पुराच्या पाण्यामुळे काही जणांचा आणि प्राण्यांचा मृत्यू झाला आहे.

वीज पडून मृत्यू होण्याच्या घटना बुलढाणा, अमरावती, भंडारा आणि धुळे या जिल्ह्यांमध्ये नोंदवल्या गेल्या आहेत. रायगड जिल्ह्यात दरड कोसळून एका व्यक्तीचा मृत्यू झाला, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात पाण्यात बुडून एकाचा मृत्यू झाला. नागपूर, बीड आणि चंद्रपूर येथे पुरात वाहून जाण्याच्या घटना घडल्या. अकोला जिल्ह्यात भिंत कोसळून एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. 

Related Articles

Back to top button