ब्रेकिंग! काल स्वबळाचा नारा, आज बॅकफूटवर?

ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी काल स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्वबळावर लढणार असल्याची घोषणा केली होती. त्यामुळे महाविकास आघाडी तुटली की काय? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली. तसेच हा निर्णय राऊतांचा आहे, की उद्धव ठाकरेंचा, असा प्रश्नही महाविकास आघाडीच्या काही नेत्यांनी उपस्थित केला. दरम्यान, आता राऊत यांनी यासंदर्भात स्पष्टीकरण दिले आहे. राऊत यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना त्यांच्या कालच्या विधानाबाबत विचारण्यात आले. यासंदर्भात बोलताना, महाविकास आघाडी तुटली असे मी कधीच म्हणालो नव्हतो. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत स्वबळावर लढाव्यात अशी कार्याकर्त्यांची भावना आहे, ती मी बोलून दाखवली, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
उद्धव ठाकरे पक्षाचे प्रमुख आहेत. ते सर्वांशी चर्चा करत असतात. मी काल फक्त एवढेच म्हटले होते की, लोकसभेसाठी आम्ही इंडिया आघाडी बनवली. विधानसभेसाठी आम्ही महाविकास आघाडी बनवली. पण स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक ही कार्यकर्त्यांची निवडणूक असते. अशावेळी जर आघाडी करून निवडणूक लढवली, तर कार्यकर्त्यांवर अन्याय होतो. त्यामुळे कार्यकर्त्यांनी ठाकरेंकडे स्वबळावर लढण्याची भावना व्यक्त केली आहे. याचा अर्थ महाविकास आघाडी तुटली असा होत नाही, असे राऊत म्हणाले.



