क्राईम

मर्डर केसमधून जामीनावर सुटला अन् दुसऱ्या गुन्ह्यात अडकला

  1. यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्ष रेखा जरे यांच्या हत्याकांडातील आरोपी सागर भिंगारदिवे याची तात्पुरत्या जामिनावर सुटका झाली. मात्र, सुटका झाल्यानंतर जेलबाहेर येताच त्याच्या अडचणी पुन्हा वाढल्या आहेत. भिंगारदिवे जेलबाहेर आला आणि त्याच्या कार्यकर्त्यांनी, समर्थकांनी त्याला खांद्यावर घेऊन, चारचाकी वाहनातून मिरवणूक काढली. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. जेलमधून सुटताच मिरवणूक काढल्याने भिंगारदिवे याच्यासह साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
  2. नगरमधील रेखा जरे यांची 30 नोव्हेंबर 2020 रोजी नगर-पुणे महामार्गावरील जातेगाव घाटात सुपारी देऊन हत्या करण्यात आली होती. या कामासाठी भिंगारदिवे याला सुपारी देण्यात आली होती. भिंगारदिवे याने हे काम आदित्य चोळके याला दिले होते. या खून प्रकरणानंतर या प्रकरणात ज्ञानेश्वर उर्फ गुड्या शिवाजी शिंदे, आदित्य सुधाकर घोडके, फिरोज राजू शेख, ऋषीकेश उर्फ टम्या वसंत पवार, सागर उत्तम भिंगारदिवे, राजशेखर अजय चकली, शेख इस्माईल शेख अली, अब्दुल रहेमान अब्दुल आरीफ, जनार्दन अंकुला चंद्रय्या यांचा समावेश आहे.
  3. यामधील काही जणांचा न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. तर काही जण अजूनही न्यायालयीन कोठडीत आहेत. या प्रकरणातील आरोपी भिंगारदिवे यास उच्च न्यायालय मुंबई, खंडपीठ औरंगाबाद येथून तात्पुरत्या स्वरुपाचा जामिन मंजूर करण्यात आला आहे. न्यायालयाने शनिवारी भिंगारदिवे याला तात्पुरत्या जामीनावर मुक्त केले. दरम्यान, या निर्णयाने जरे यांच्या समर्थकांमध्ये असंतोष पसरला आणि त्यानंतर भिंगारदिवे याच्या समर्थकांनी त्याचा भव्य जल्लोष करत त्याची वाहनातून रॅली काढली. यामुळे आता हा वाद अधिक तीव्र झाला आहे. घटनेने सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या असून अनेकांनी हत्याकांडातील मुख्य आरोपीच्या अशा थाटामाटात स्वागतावर संताप व्यक्त केला आहे.

Related Articles

Back to top button