शिंदेंची खेळी यशस्वी? अजितदादांकडे तिजोरीच्या चाव्या पण…
काल हिवाळी अधिवेशन संपताच महायुती सरकारचे खातेवाटप जाहीर करण्यात आले. या खातेवाटपात पुन्हा एकदा भाजपचाच वरचष्मा दिसला. अनेक दिग्गजांना धक्का बसला तर काही नवख्या मंत्र्यांना वजनदार खाती देण्यात आली.
भाजपचाच विचार केला तर राधाकृष्ण विखे पाटील, पंकजा मुंडे, गिरीश महाजन यांना मोठा धक्का बसला आहे. एकप्रकारे या नेत्यांचे राजकीय वजन कमी करण्याचाच प्रयत्न या माध्यमातून झाल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. तर आता एकनाथ शिंदे यांच्या राजकीय खेळीचीही चर्चा सुरू झाली आहे. राज्याच्या तिजोरीच्या चाव्या जरी अजितदादांच्या हाती असल्या तरी खर्चाचे अधिकार मात्र शिंदेंनाच राहणार आहेत, असे चित्र आहे.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर काल सायंकाळी खातेवाटप जाहीर करण्यात आले. शिंदे यांच्या आमदारांना वजनदार खाती मिळाल्याचे दिसत आहे. शिंदे यांनी गृह खात्याचा आग्रह सोडून दिल्यानंतरच्या वाटाघाटीत बाजी मारली आहे. सध्याच्या परिस्थितीत शिंदे गट फडणवीसांच्या मंत्रिमंडळात दुसऱ्या क्रमांकावर राहिला आहे.
याचे कारण म्हणजे अनेक महत्वाची खाती आपल्याकडे घेण्यात शिंदे यशस्वी ठरले आहेत. नगरविकास, गृहनिर्माण, सार्वजनिक बांधकाम तसेच एमएमआरडी, सिडको, एमएसआरडीचा ताबा शिंदे गटाकडेच राहणार आहे. इतकेच नाही तर राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांचा निधीही शिंदे यांच्याच हाती राहणार आहे. अर्थमंत्री म्हणून राज्याच्या तिजोरीच्या चाव्या जरी अजितदादा यांच्याकडे राहणार असल्या तरी खर्चाचे अधिकार शिंदे यांच्याकडे राहणार आहेत. खातेवाटपावेळी शिंदेंनी गृहखात्यासाठी जोर लावला होता.
मुख्यमंत्रिपद मिळाले नाही तर किमान गृह विभाग तरी मिळावा, असा शिंदेंचा आग्रह होता. यासाठी शिंदेंकडून फडणवीस उपमुख्यमंत्री असताना गृह खाते त्यांच्याकडे होते, असा तर्क दिला जात होता. मात्र भाजपने कोणत्याही परिस्थितीत गृह विभाग सोडण्यास नकार दिला. गृह खाते मिळणार नाही म्हटल्यावर शिंदेंनीही दबावतंत्राचा वापर करत गृहनिर्माण सारखे वजनदार खाते पदरात पाडून घेतले आहे.