ब्रेकिंग! काँग्रेस पुन्हा तोंडावर आपटले
विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला. आघाडीतील तिन्ही पक्षांची दाणादाण उडाली. काँग्रेसला फक्त १६ जागा जिंकता आल्या. या निराशाजनक कामगिरीनंतर काँग्रेसमध्ये असंतोष धुमसू लागला आहे. काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला यांच्या उपस्थितीत नागपुरात झालेल्या बैठकीत काँग्रेसमध्येच एकवाक्यता नसल्याचे स्पष्ट दिसून आले. ईव्हीएमच्या मु्द्द्यावर पक्षांत दोन गट पडल्याचे या बैठकीत अधोरेखित झाले. ईव्हीएमचा दोष वाटतो का, असा थेट प्रश्न चेन्निथला यांनी सर्व पराभूत उमेदवारांना विचारला. त्यावर बहुसंख्य उमेदवारांनी ईव्हीएमचा घोळ असल्याचा दावा केला तर काही जणांनी मात्र ईव्हीएमवर पराभवाचे खापर फोडणे योग्य नाही, असे सांगितले.
विधानसभेत काँग्रेस गटनेतेपदी कुणाला संधी द्यावी, प्रदेशाध्यक्ष बदलायचा का याबाबत चर्चा करण्यासाठी चेन्निथला यांनी विधानसभा आणि विधानपरिषदेतील आमदार तसेच विधानसभा निवडणुकीतील पराभूत उमेदवारांशी स्वतंत्रपणे चर्चा केली. नागपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात मंगळवारी सायंकाळी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीसाठी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, माणिकराव ठाकरे, नितीन राऊत, अरिफ नसीम खान, यशोमती ठाकूर, भाई जगताप, विकास ठाकरे आदी उपस्थित होते.
चेन्निथला यांनी निवडणुकीतील पराभूत उमेदवारांशीही स्वतंत्र चर्चा केली. ईव्हीएमचा दोष वाटतो का, असा प्रश्न त्यांनी या उमेदवारांना विचारला. कारण निवडणुकीच्या निकालानंतर ईव्हीएममध्ये घोटाळा झाल्याचा आरोप अनेकांनी केला होता. ज्यांचा पराभव होणार नाही, अशी खात्री असताना त्यांचा पराभव झाला.
त्यामुळे ईव्हीएममध्ये गडबड असल्याचा मुद्दा वारंवार उपस्थित केला जात होता. यामध्ये काँग्रेसचे नेते देखील आघाडीवर होते. या बैठकीतही चेन्निथला यांनी हा प्रश्न उमेदवारांना विचारला. त्यावर बहुतांश उमेदवारांनी बूथची आकडेवारी सांगत ईव्हीएमचा घोळ असल्याचा दावा केला. मात्र, काही उमेदवार असेही होते ज्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, काँग्रेस पक्ष ताकदीने निवडणूक लढलाच नाही. ईव्हीएमवर खापर फोडणे योग्य नाही.