महाराष्ट्र
ब्रेकिंग! ईव्हीएमचं रडगाणं सुरुच

- महायुतीच्या प्रचंड विजयावर विरोधकांना अजूनही शंकाच आहे. ईव्हीएमवर अनेकांनी आरोप केले आहेत. सोलापूर जिल्ह्यातील मारकडवाडी येथील आंदोलन सर्वच विरोधकांनी उचलून धरले आहे. आता याच विषयात एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. काल ज्येष्ठ नेते शरद पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी पराभूत उमेदवारांची बैठक झाली. सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यावर या बैठकीत चर्चा झाल्याचे समजते. आज किंवा उद्या ही याचिका दाखल होईल, असेही काहींचे म्हणणे आहे. तर दुसरीकडे आज सायंकाळी अरविंद केजरीवाल, अभिषेक मनू सिंघवी, हेही पवारांसोबत याच विषयावर चर्चा करणार आहेत.
- विधानसभेला पराभूत झालेल्या उमेदवारांनी काल पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी बैठक घेतली. त्यात पवारांनी पुढची दिशा सांगितली. हडपसरचे उमेदवार प्रशांत जगताप, कोपरगावचे उमेदवार संदीप वर्पे, खडकवासल्याचे उमेदवार सचिन दोडके, शिवाजीनगरचे उमेदवार दत्ता बहिरट, काँन्टोन्मेंट बोर्डाचे उमेदवार रमेश बागवे आदींसह माळशिरसचे आमदार उत्तमराव जानकरही या बैठकीला उपस्थित होते. सुप्रीम कोर्टात आज किंवा उद्या याचिका दाखल करण्याचे या बैठकीत ठरले.
- माळशिरस मतदारसंघातून शरद पवार गटाचे जानकर हे विजयी झाले आहेत. मात्र त्यांनाही मतांच्या फरकावर संशय आहे. आपल्याला कमीत कमी एक लाख मतांचे लीड हवे होते, असे त्यांचे म्हणणे आहे. पराभूत आमदारांच्या बैठकीस तेही उपस्थित होते. प्रसंगी आपण आपल्या आमदारकीचा राजीनामा देऊ, पण ईव्हीएम विरोधात लढाई करु, असे त्यांनी सांगितले. शरद पवार गटाचे इतर आमदारही या विरोधात एकवटून तेही राजीनामा देतील, अशीही शक्यता व्यक्त केली जात आहे.