महाराष्ट्र

एकनाथ शिंदे नवा डाव टाकणार?

  • महायुती सरकारचा शपथविधी होण्यापूर्वी एकनाथ शिंदे हे गृहखात्यावर अडून बसल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे शिंदे हे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यासही फारसे उत्सुक नव्हते, अशी चर्चा होती. हा शपथविधी पार पडल्यानंतरही महायुती सरकारच्या खातेवाटपाबाबत निश्चित अशी कोणतीही माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे शिंदे यांच्या शिवसेनेला कोणती खाती मिळणार, याबाबत अद्याप संभ्रम आहे. या पार्श्वभूमीवर काल रात्री वर्षा बंगल्यावर महत्त्वाची बैठक पार पडली. आता अनेक आमदार मंत्रीपद मिळावे, यासाठी लॉबिंग करत आहेत. अशातच आता शिंदे हे नवीन डाव टाकणार आहेत. शिंदे हे मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेकडून पाच नवीन चेहऱ्यांना मंत्रीपदाची संधी देणार आहेत.
  • सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या चौदा डिसेंबरला मंत्रीमंडळ विस्तार केला जाणार आहे. काल फडणवीस, शिंदे आणि अजितदादा पवार यांच्यात रात्री एक बैठक पार पडली. या बैठकीत मंत्रिमंडळ खात्याच्या वाटपावरून चर्चा करण्यात आली. यानंतर आज मंत्रिमंडळ विस्ताराच्या बाबतीत एक अंतिम बैठक होईल. त्यातच आता मंत्रिमंडळ विस्तारात शिंदे गटाकडून दोन मंत्र्यांना डच्चू दिला जाणार आहे. तर पाच नवीन आमदारांना मंत्रि‍पदाची संधी मिळणार आहे.
  • मंत्र्यांचा राज्य मंत्रिमंडळात समावेश करण्यासाठी शिवसेनेच्या माजी आणि संभाव्य मंत्र्यांची नावे समोर आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार माजी मंत्री संजय राठोड आणि अब्दुल सत्तार यांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट केला जाणार आहे.
  • गेल्या मंत्रिमंडळात गुलाबराव पाटील, शंभुराज देसाई, उदय सामंत, तानाजी सावंत, दादा भुसे, दीपक केसरकर यांच्याकडे मंत्रीपदे देण्यात आली होती. आता भरत गोगावले, संजय शिरसाट, प्रताप सरनाईक, अर्जुन खोतकर, विजय शिवतारे या पाच जणांना मंत्रिपदाची संधी दिली जाण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

Related Articles

Back to top button