महाराष्ट्र
‘या’ गावात आज बॅलेट पेपरवर मतदान

- मारकडवाडीत बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचा मुद्दा गाजला असतानाच, महाराष्ट्रातील एका गावात आज बॅलेट पेपरवर मतदानाला सुरुवात झाली. सकाळी आठ वाजेपासून मतदानासाठी महिलांनी रांगा लावलेल्या दिसल्या. नंदूरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील असलोद या गावात हे मतदान झाले.
- नंदूरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यात असलोद गाव आहे. हे गाव गुजरात राज्याच्या सिमेलगत असल्याने या गावात अवैध दारुचे धंदे गेल्या अनेक वर्षांपासून सुरु आहेत. गावात दारूबंदी करण्याची मागणी महिला, गावकरी आणि अनेक सामाजिक संघटनांनी अनेकदा केली आहे. महिलांनी तर या प्रश्नावर लढाही उभारला होता. प्रशासनाकडे पाठपुरावा केल्यानंतर आज गावात दारूबंदीसाठी मतदान घेण्याचा निर्णय घेण्यात आला. महिलांनी यासाठी विशेष पुढाकार घेतला. आज सकाळी आठपासून मतदानाला सुरूवात झाली. दारूबंदीसाठी मतदान घेणारे असलोद हे नंदूरबार जिल्ह्यातील पहिले गाव ठरले आहे. गावातील 1,260 महिला मतदारांनी या मतदानासाठी पुढाकार घेतला. तहसीलदार गिरासे यांनी सर्व यंत्रणा कामाला लावत मतदान घडवून आणले. अवैध दारूमुळे गावातील अनेक कुटुंबात कलह निर्माण झाला होता. तरुण व्यसनाधीन होत होते. अनेकांचे संसार उध्वस्त झाले होते. त्यामुळे गावात दारूबंदी करण्यासाठी महिलांनी एकत्र येत, मतदानाची मागणी केली होती. अखेर प्रशासनाने ही मागणी मान्य करत, आज लोकशाही पद्धतीने गावात मतदान घेतले. उद्या याबाबतचा फैसला समजणार आहे.



