संजय राऊतांचा सनसनीखेज दावा

राज्यात पाच कोटी 71 लाख मतदारांनी 2024 च्या लोकसभेसाठी मतदान केले. त्याचवेळी त्याच महाराष्ट्रात 6 कोटी 45 लाख मतदारांनी विधानसभेत मतदान केले. साधारण 74 लाख जादा मतदारांनी विधानसभेत मतदान केले. लोकसभेच्या तुलनेत हे 74 लाख वाढीव मतदान संशयास्पद आहे. याच वाढीव मतदारांनी महाराष्ट्राच्या विधानसभा निकालाची दिशाच बदलून टाकली, असा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपचा पराभव झाला, पण पुढच्या चार महिन्यांत भाजप विक्रमी बहुमताने जिंकला. निवडणूकपूर्व सर्व चाचण्यांत विधानसभेत महाविकास आघाडीच जिंकेल, असे चित्र होते. निदान विजयासाठी काट्याची टक्कर होईल, अशीच हवा होती. पण काँग्रेस, शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालची शिवसेना मिळून एकत्रित पन्नास जागाही मिळाल्या नाहीत हे कुणालाच पटणार नाही, असे राऊत यांनी सामना दैनिकातील आपल्या ‘रोखठोक’ कॉलममध्ये म्हटले आहे.
आझाद मैदानावर नवे सरकार शपथ घेत असताना महाराष्ट्रात ठिकठिकाणी भाजपचा अनपेक्षित विजय आणि ईव्हीएम घोटाळ्याविरुद्ध आंदोलने सुरू होती. राज्यातील निवडणूक निकालांवर विश्वास बसत नसल्याने ‘बॅलेट पेपर’वर पुन्हा निवडणुका घ्या, अशी मागणी संपूर्ण महाराष्ट्रातून व्हावी हे चिंताजनक असल्याचे राऊत यांनी नमूद केले.