महाराष्ट्र
ब्रेकिंग! पुण्यात शिंदे गटाच्या नेत्याची हत्या, आरोपी फरार

- राज्यात गुन्हेगारीच्या घटनात वाढ होऊ लागली आहे. आज पुणे जिल्ह्यातील शिक्रापूरमध्ये दिवसा ढवळ्या खुनाची घटना घडल्याची घडली. शिक्रापूरचे माजी उपसरपंच आणि शिवसेनेचे शिंदे गटाचे जिल्हा सल्लागार दत्तात्रय बंडू गिलबिले यांची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या करण्यात आली. ही घटना आज दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली. त्यांच्या घराजवळ ही घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.
- दत्तात्रय बंडू गिलबिले (वय 52) यांच्या हत्येमागील कारण अद्याप अस्पष्ट असून या घटनेचा पोलीस तपास करत आहेत.
- या संदर्भात अधिक माहिती अशी की, रविवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास गिलबिले हे शिक्रापूर येथील त्यांच्या बंगल्याच्या आवारात खुर्चीवर बसून होते. त्याचवेळी काही अज्ञात आरोपींनी अचानक त्यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. हल्लेखोरांनी त्यांच्या मानेवर वार केले. यामुळे ते गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात पडले. त्यांच्यावर वार केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पळून गेले.
- दरम्यान, घटनेची माहिती समजताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. गिलबिले यांना तातडीने पुण्यातील खासगी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, रुग्णालयात नेत असतानाच त्यांचा मृत्यू झाला.



