राज्याच्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा दारुण पराभव करत महायुतीने पुन्हा एकदा सत्तेवर दावा केला. महायुतीच्या या लाटेत मविआचा धुव्वा उडाला. एकेकाळी महाराष्ट्रात निर्विवाद सत्ता असणाऱ्या काँग्रेसला केवळ 16 जागांवर समाधान मानावे लागले. दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीतून माघार घेतल्यानंतर भाजपचाच मुख्यमंत्री होणार हे अधोरेखित झाले आहे.
मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे सांगितले जात आहे. मात्र या घडामोडी घडत असतानाच शिंदे यांनी गुगली टाकत त्यांच्या गावी निघून गेले आहेत. यातच केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचे नाव मुख्यमंत्रिपदासाठी अचानक पुढे आले होते. त्यांच्या नावाची जोरदार चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली होती. त्यामुळे मोहोळ यांनी स्वतःच ट्विट करत या चर्चांना फुलस्टॉप दिला. यानंतर तरी मुख्यमंत्रिपदाच्या चर्चा थांबतील असे वाटले होते. पंरतु, या चर्चांमध्ये आता आणखी एक ट्विस्ट आला आहे. मोहोळ नाही तर आता भाजपचे डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण यांचे नाव पुढे आले आहे.
फडणवीस यांनीच चव्हाणांना दिल्लीत बोलावून घेतल्याची माहिती मिळाली आहे. डोंबिवलीला यंदा गृहमंत्रिपद मिळेल, अशी चर्चा असतानाच हा नवा ट्विस्ट आला आहे. अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांची नुकतीच बैठक झाली. या बैठकीत बिगर मराठा मुख्यमंत्री दिल्यास काय प्रतिक्रिया उमटेल, याची चाचपणी करण्यात आली. त्यामुळे जर फडणवीस यांच्या नावाला विरोध झालाच तर चव्हाण यांना संधी दिली जाऊ शकते, अशी चर्चा आहे.