विधानसभा निवडणुकीनंतर ईव्हीएम व निवडणूक आयोगावर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी शंका घेणे सुरुच ठेवले आहे. सामना या वृत्तपत्रात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा निवडणूक प्रक्रियेवर गंभीर आरोप केले आहेत. निवडणूक यंत्रणाच विकली गेली असून झालेल्या मतदानापेक्षा दोन कोटी मते जास्त मोजली गेल्याच्या आरोप खासदार राऊत यांनी केला आहे. मोदी-शहा जोपर्यंत सत्तेत आहे, तोपर्यंत निवडणूकच लढवू नये, असा खळबळजनक दावा खासदार राऊत यांनी केला आहे.
सामना वृत्तपत्रातून खा. राऊत यांनी ईव्हीएमवर आणि राज्याच्या निकालावर हल्लाबोल केला. ते म्हणाले, राज्यात 20 नोव्हेंबरला मतदान झाले. तेव्हा 5 कोटी 70 लाख लोकांनी मतदान केल्याचे सांगितले गेले. 23 नोव्हेंबरला मतमोजणी झाली, तेव्हा 7 कोटी 70 लाख मते मोजली गेली.
हे वरचे दोन कोटी मतदान आले कोठून..? हे इतके मतदान वाढले कसे..? ईव्हीएमला गर्भ राहिला काय, असा गंभीर सवाल त्यांनी उपस्थित केला. निवडणूक यंत्रणाच विकली गेली आहे. जेवढे मतदान झाले, त्यापेक्षा काही लाख मते जास्त मोजली गेली. त्यामुळे निकाल फिरला. विधानसभेच्या निकालानंतर लोकांमध्ये आनंदाचे वातावरण नाही. फडणवीस – शिंदे कसे जिंकले? हा प्रश्न जनतेला पडला आहे.