राजकीय

ईव्हीएम हॅक होऊ शकते का?, मतदान ते मतमोजणी कशी होते प्रक्रिया?

राज्यात विधानसभा निवडणुकीचा निकाल नुकताच लागला. यामध्ये महायुतीला प्रचंड यश मिळाले. एकट्या भाजपच्या विजयी उमेदवारांची संख्या पाहता सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपला आता कोणत्याही मित्रपक्षांची देखील गरज नाही, अशी परिस्थिती निकालानंतर दिसून येत आहे.

ईव्हीएममध्ये घोटाळा झाल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात असताना राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी देखील शंका उपस्थित केली. ईव्हीएम हॅक केले जाऊ शकते, याचे प्रेझेंटेशन आमच्यासमोर मांडण्यात आल्याचा दावा देखील त्यांनी केला. त्यांच्या या दाव्यानंतर खरच ईव्हीएम हॅक होऊ शकते का?, ईव्हीएममध्ये घोटाळा केला जाऊ शकतो का, मतदान अन् मतमोजणी नेमकी कशी होते, यासह अनेक प्रश्नांची चर्चा आता होऊ लागली आहे.

ईव्हीएम म्हणजे इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन. हा तीन यंत्रांचा संच असतो. त्यात बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट आणि व्हीव्हीपॅट युनिट असतात. प्रत्येक मशीनला क्रमांक असतो. ही मशीन जिल्ह्यानिहाय येतात. ती आल्यावर फर्स्ट लेव्हल क्लिनिंग सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसमक्ष होते. 

या यंत्रांवरचे सर्व नोंदी, सील इत्यादी काढून टाकली जातात. या यंत्रांमधील डेटा काढून टाकला जातो. नादुरुस्त यंत्रं कंपनीला परत पाठवली जातात. एका जिल्ह्यासाठी काही हजार यंत्रं येतात. त्यामुळे ही प्रक्रिया काही दिवस चालते.

ईव्हीएम संदर्भात हे झाल्यावर डमी व्होटिंग केले जाते. ईव्हीएम यंत्रं स्टोर रुममध्ये सीलबंद केली जातात. तिथे पोलीस पहारा असतो. त्याशिवाय सीसीटीव्हीची पाळत असते. ईव्हीएम यंत्रांचे क्रमांक प्रत्येक उमेदवाराच्या प्रतिनिधीला दिले जातात.

 

प्रत्येक मतदान केंद्रांवर कोणती यंत्रं पाठवली जाणार याचे वाटप सर्व उमेदवारांच्या प्रतिनिधींसमोर तीन-चार वेळा केली जाते. जेणेकरून यंत्रसंचात गडबड घोटाळा होणार नाही याची खातरजमा केली जाते. प्रत्येक मतदान केंद्रावर कोणते यंत्रसंच पाठवले जाणार याची यादी उमेदवाराच्या कार्यालयाला मिळते. उमेदवारांच्या प्रतिनिधींनी सदर यादीनुसार यंत्र संच आले आहेत, याची खातरजमा करायची असते.

उमेदवार प्रतिनिधींच्या खातरजमेनंतर एक हजार मतांचे चाचणी मतदान घेतले जाते. ज्या चिन्हाचे बटण दाबले की त्याच चिन्हाची नोंद व्हीव्हीपॅटवर होते आहे, याची खातरजमा केली जाते. सर्व उमेदवारांचे प्रतिनिधी प्रत्येक मतदान केंद्रांवर असतात. त्यांच्या समक्ष ही चाचणी घेतली जाते. त्यासंबंधात ते आक्षेप घेऊ शकतात. 

मतदान किती वाजता सुरू झाले, किती मतदान झाले, मतदानाच्या दरम्यान कोणतं मशीन का बदलले, मतदान केव्हा संपले इत्यादीची नोंद असलेला फॉर्म १७- सी प्रत्येक उमेदवाराच्या प्रतिनिधीला दिला जातो. मतपेट्या वा इव्हीएमचा संच कडेकोट बंदोबस्तात ठेवला जातो. तिथे कॅमेऱ्यांची निगराणी असते. त्याशिवाय उमेदवारांच्या प्रतिनिधींचाही पहारा असतो.

मतमोजणी सुरू करण्यापूर्वी आलेल्या यंत्रांमधून कोणत्याही पाच यंत्रांची निवड करून व्हीव्हीपॅटवरील नोंदी आणि मतदान यांचा ताळमेळ बसतो आहे का याची खातरजमा सर्व उमेदवारांच्या प्रतिनिधींसमोर केली जाते. मतमोजणी बूथनिहाय होते. प्रत्येक बुथवरील मतदानाचा तपशील फॉर्म 17 सी वर नोंदलेला असतो. सदर नोंदीनुसार मतमोजणी होत आहे का, ह्यावर उमेदवारांच्या प्रतिनिधींनी लक्ष ठेवायचे असते. इलेक्ट्रॉनिक व्होटिंग सिस्टीम वा प्रणाली काय आहे, ती कशी राबवायची ह्याची सविस्तर माहिती निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवर आहे.

Related Articles

Back to top button