काँग्रेस नेत्यांचा अतिआत्मविश्वास नडला
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीची सुनामी आली. महायुतीतील तिन्ही घटक पक्षांनी मोठा विजय मिळवला आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीची पुरती दाणादाण उडाली. ठाकरे गटाला फक्त 20 जागा मिळाल्या तर काँग्रेसलाही फक्त 16 आमदार निवडून आणता आले. शरद पवार गटाचा स्ट्राईक रेट कमालीचा घसरला. या पराभवाने आता महाविकास आघाडीलाच हादरे बसू लागले आहेत.
दोन दिवसांपूर्वी उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत पक्षाच्या नेत्यांनी मविआतून बाहेर पडून स्वबळावर निवडणुका लढण्याचा सूर आळवला. त्यानंतर आता विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही काँग्रेसवर घणाघाती टीका केली आहे.
जम्मू काश्मीर, हरियाणा आणि महाराष्ट्रात कांग्रेस निवडणूक जिंकू शकत होती. मात्र, लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेस नेत्यांच्या मनात अतिआत्मविश्वास निर्माण झाला होता, असे दानवे यांनी सांगितले. त्यांच्या या वक्तव्यावर आता काँग्रेसनेही सावध भूमिका घेतली आहे. यावर आज सविस्तर प्रतिक्रिया देऊ, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले.
लोकसभा निवडणुकीत सगळ्यांचा एकमेकांना फायदा झाला. कुणाचाही तोटा झालेला नाही.
काँग्रेसचा एक खासदार होता, तिथे 13 खासदार निवडून आले. आमचे चार होते तिथे 9 जिंकले. अशी परिस्थिती होती. यानंतर जम्मू काश्मीर, हरियाणा आणि महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीतही काँग्रेस जिंकू शकत होती. अशी स्थिती निश्चितच होती. पण लोकसभेची निवडणूक जिंकल्यानंतर काँग्रेस नेत्यांच्या मनात अतिआत्मविश्वास निर्माण झाला, अशी खोचक टीका दानवेंनी केली.