राजकीय
राज्यात शरद पवार पॅटर्न फेल, पश्चिम महाराष्ट्राचा गड उद्ध्वस्त

- महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत महायुतीने ऐतिहासिक विजय मिळवला आहे. राज्यात मागील पाच वर्षांपासून राजकीय समीकरणे बदलली आहेत. अनेक राजकीय घराण्यांत आणि पक्षांमध्ये फूट पडली. काल लागलेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाने मात्र महाविकास आघाडीला मोठा धक्का बसलेला आहे. आतापर्यंत पश्चिम महाराष्ट्र म्हणजे शरद पवार असेच समीकरण होते. परंतु या निवडणुकीने हा समज खोडून काढला आहे.
- आतापर्यंत अनेक चढ-उतार आले होते, परंतु शरद पवार यांचे पश्चिम महाराष्ट्रावर वर्चस्व कायम टिकून होते. परंतु कालच्या विधानसभा निवडणुकीच्या ऐतिहासिक निकालानंतर मात्र पवारांच्या हातून गढ ढासळला आहे. पश्चिम महाराष्ट्रात एकूण 58 विधानसभा मतदारसंघांपैकी 46 मतदारसंघांमध्ये महायुतीला विजय झाला आहे. यामध्ये भाजपला 24, अजितदादा पवार गटाला 11 तर शिंदे गटाला 7 जागा मिळालेल्या आहेत. तर महाविकास आघाडीला मिळालेल्या 12 जागांमध्ये शरद पवार गटाला 7, ठाकरे गटाला 2 आणि काँग्रेसला 1 जागा मिळालेली आहे.
- साखर पट्ट्यात भाजप आणि महायुतीला अभूतपूर्व यश मिळाले आहे. पवारांचा सबालेकिल्ला ढासळल्याची चर्चा आहे. आतापर्यंत पवार यांनी सहकारी संस्था, साखर कारखाने आणि सहकार चळवळीची सांगड घातली.
- त्यांनी पश्चिम महाराष्ट्रामध्ये स्वत:च्या पक्षाची मोठी ताकद उभी केली. भाजपने 2014 नंतर देशात आणि राज्यामध्ये सत्ता काबीज केली. परंतु पवारांच्या पश्चिम महाराष्ट्रातील वर्चस्वाला अद्याप धक्का बसलेला नव्हता. पश्चिम महाराष्ट्र म्हणजे शरद पवार ब्रॅंड असे गृहीत होते. परंतु यंदाच्या निकालाने मात्र हे समीकरणच मोडीत काढले आहे. हा पवारांना सर्वांत मोठा धक्का मानला जात आहे.



