राजकीय

ब्रेकिंग! लाडकी बहीण योजनेचा परिणाम होणार?

राज्यात विधानसभा निवडणूक जाहीर होण्याआधी महायुती सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली. या योजनेत महिलांच्या खात्यात दीड हजार रुपये जमा केले जात आहेत. सध्या आचारसंहितेमुळे तूर्तास या योजनेची अंमलबजावणी थांबली आहे. सत्ताधारी पक्षांकडून प्रचारात या योजनेचा उल्लेख केला जात आहे. त्यामुळे विरोधी महाविकास आघाडीत अस्वस्थता वाढली आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी याच अस्वस्थतेवर बोट ठेवले आहे. लाडकी बहीण योजनेचा काही ना काहीतरी परिणाम नक्कीच होईल, असे पवार म्हणाले. पवार यांनी आज सातारा येथे माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यातील सत्ताधाऱ्यांवर घणाघाती टीका केली. 

पवार म्हणाले, आताची जी निवडणूक आहे, या निवडणुकीत वेगळी स्थिती आहे. आज सत्ता ज्यांच्या हातात आहे, त्या सत्ताधारी पक्षाला लोकसभा निवडणुकीत जो फटका बसला त्याची त्यांनी अतिशय गांभीर्याने दखल घेतली आहे. गंभीर दखल घेतली म्हणजे त्यांनी काय केले तर लोकांना अधिक खूश करता येईल, अशा योजना सुरू केल्या. त्याची उपयुक्तता किती आहे, किती दिवस टिकेल याची माहिती असली तरी आज वेळ मारून न्यायची आणि निवडणुका जिंकायच्या हे त्यांचे सूत्र आज मला दिसत आहे.

लाडकी बहीण योजनेत जवळपास दोन कोटी महिलांना त्यांनी दीड हजार रुपयांप्रमाणे पैसे दिले आहेत. आता इतके पैसे वाटले म्हटल्यानंतर त्याचा परिणाम काही ना काहीतरी नक्कीच होईल. पण फार परिणाम होईल असे काही मला वाटत नाही. त्याचे कारण असे आहे की एका बाजूला तुम्ही महिलांना मदत केलीत पण दुसऱ्या बाजूला राज्यात महिलांवरील अत्याचारात वाढ झाल्याचे दिसून येत आहे, असे पवार म्हणाले.

Related Articles

Back to top button