राजकीय
ठाकरेंना आणखी एक दणका

- सध्या महायुती सरकारचे कामकाज सुरू झाले आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीला गळती लागली आहे. याचा सर्वाधिक फटका ठाकरे गटाला बसत आहे. ठाकरेंच्या शिवसेनेतील अनेक जुन्या आणि कडवट शिवसैनिकांनी शिंदे गटाची वाट धरली आहे. आता अशीच एक बातमी छत्रपती संभाजीनगरमधून पुढे आली आहे. माजी महापौर नंदकुमार घोडेले आणि माजी महापौर अनिता घोडेले यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला आहे.
- दरम्यान निवडणुकीच्या निकालापासूनच संभाजीनगर शिवसेनेत अस्वस्थता वाढली होती. माजी महापौर नंदकुमार घोडेले आणि अनिता घोडेले लवकरच ठाकरेंना जय महाराष्ट्र करतील असे सांगितले जात होते. अखेर त्यांनी हा निर्णय घेतला. उपमुख्यमंत्री शिंदे यांची मुंबईत भेट घेत पक्षात प्रवेश केला. यावेळी त्यांच्या बरोबर शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र जंजाळ देखील उपस्थित होते.
- छत्रपती संभाजीनगर हा शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे. अनेक वर्षे या मतदारसंघावर शिवसेनेचाच भगवा फडकत आहे. मागील पंचवार्षिक निवडणुकीत मात्र शिवसेनेचा पराभव झाला होता. परंतु, या लोकसभा निवडणुकीत शिंदेंच्या शिवसेनेने येथे बाजी मारली. संदिपान भुमरे खासदार झाले आहेत. यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात महायुतीला चांगले यश मिळाले. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहेत. लवकरच महापालिकेच्या निवडणुका घोषित होतील.
- या निवडणुकांच्या दृष्टीने स्थानिक राजकारणाने वेग घेतला आहे. नेते मंडळींचे पक्षांतर सुरू झाले आहे. याचा सर्वाधिक फटका उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला बसत आहे. एकेकाळचे अत्यंत निष्ठावंत आणि कट्टर शिवसैनिकही पक्षाला सोडचिठ्ठी देत आहेत.