राजकीय
शरद पवारांनी जाहीर केली मुख्यमंत्रीपदाबाबत भूमिका
- विधानसभा निवडणुकीचे मतदान काही दिवसांवर येवून ठेपले आहे. दरम्यान, महाविकास आघाडीची सत्ता आल्यास मुख्यमंत्री कोण होणार, याबाबत या आघाडीतील नेत्यांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये मोठी उत्सुकता आहे. जागावाटप आणि प्रचाराला सुरुवात होण्याआधी उद्धव ठाकरे यांनी ‘मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर करा’, अशी मागणी केली होती. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने पहिले महायुतीला सत्तेतून बाहेर खेचणे हे आमचे कर्तव्य असल्याचे म्हणत या मुद्दाला बगल दिली होती. मात्र ज्येष्ठ नेते शरद पवारांनी आता पहिल्यांदाच याबाबत स्पष्टपणे आपली भूमिका मांडली आहे.
- पवार यांनी एका मुलाखतीमध्ये विविध विषयांवर आपली मते स्पष्टपणे मांडली. यामध्ये मुख्यमंत्री कोणाचा असावा, यासंदर्भातही त्यांनी आपले मत व्यक्त केले. पवार यांनी म्हटले की, आम्ही सत्तेत आल्यास लाडकी बहीण योजना रद्द करणार नाही. मात्र त्यात काही बदल करू. याच मुलाखतीमध्ये पवारांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुकही केले. त्यांनी म्हटले की, मुख्यमंत्रीपदाच्या काळात फडणवीस यांनी व्यक्तिगत स्वच्छ कारभार केला, अशी जनभावना होती ती चुकीची नाही. सुप्रिया सुळे यांच्या रुपाने महाराष्ट्राला पहिल्या महिला मुख्यमंत्री मिळणार का ? असा प्रश्न अनेकदा विचारला जातो.
- मुख्यमंत्री पदासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना पवार यांनी म्हटले की, सुप्रिया सुळे या मुख्यमंत्री झाल्या तर आनंदच आहे. मात्र सुप्रिया यांना देशाच्या राजकारणात अधिक रस आहे. पवार यांनी मुख्यमंत्रीपदासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट करताना म्हटले की, स्वच्छ शब्दांमध्ये सांगतो, ज्यांचे आमदार जास्त निवडून येतील, त्यांचा मुख्यमंत्री होईल, इतरांनी त्याला पाठिंबा द्यावा.