ब्रेकिंग! सोलापुरात सहलीसाठी आलेल्या प्रांजलचा मृत्यू
सोलापूर (प्रतिनिधी) सहलीसाठी आलेल्या आठ वर्षाच्या मुलीच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी शाळेच्या मुख्याध्यापकासह संबंधित इतर लोकांविरुद्ध जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ४ फेब्रुवारी २०२४ रोजी दुपारी तीन वाजण्याच्या दरम्यान शावर अँड टॉवर वॉटर पार्क सोलापूर येथे घडली. याप्रकरणी नितीन मुरलीधर मस्के (वय-४२,रा.केशवराज गल्ली,गेवराई जिल्हा बीड) यांनी तब्बल आठ महिन्यानंतर दि.२५ ऑक्टोंबर २०४ रोजी जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
त्यांच्या फिर्यादीवरून गणेश पंडितराव क्षीरसागर (रा.गेवराई जिल्हा बीड शाळेचे मुख्याध्यापक व संबंधित इतर लोक) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,फिर्यादी यांची मुलगी प्रांजल मस्के (वय-८) ही तिच्या शाळेच्या सहलीमध्ये इतर मुलांसोबत हिप्परगा सोलापूर येथील शॉवर अँड टॉवर वॉटर पार्क या ठिकाणी सहलीकरिता आली होती. त्यावेळी तिच्या मैत्रिणीबरोबर वेवपूल मधील पाण्यात खेळत असताना खोल पाण्यामध्ये खेळत जाऊन पाण्यात पडून तिच्या नाकात तोंडात पाणी जाऊन ती मयत झाली आहे. तसेच वॉटर पार्क मध्ये सहली करिता आलेल्या लहान मुलांची जबाबदारी असणाऱ्या हिरा पब्लिक स्कूल गेवराईचे संस्थाचालक व संबंधित इतर लोकांनी प्रांजल हिच्या हालचालीकडे लक्ष न देता निष्काळजीपणाने हयगयीने कृत्य करून तिच्या मरण्यास कारणीभूत झाले आहेत.असे फिर्यादीत नमूद आहे. पुढील तपास पोसई.बोमणे हे करीत आहेत.