राजकीय
शिंदे गटाच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर, पण…

- राज्यात पुढील महिन्यात विधानसभा निवडणूक होणार आहे. त्या दृष्टिकोनातून सर्वच राजकीय पक्षांकडून तयारी केली जात आहे. यंदाची विधानसभा निवडणूक अटीतटीची होईल, असा अंदाज आहे. दरम्यान, भाजपानंतर आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनेही आपली पहिली उमेदवारी यादी जाहीर केली. काल रात्री उशिरा ४५ जणांची यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये मंत्री आणि बहुतांश विद्यमान आमदारांना संधी देण्यात आली. पण बंडाच्यावेळी सोबत असणाऱ्या तीन आमदारांना आणखी वेट अँड वॉच करावे लागणार आहे.
- डॉ. बालाजी किणीकर हे अंबरनाथ मतदारसंघातून मागील सलग तीन टर्म आमदार असून यंदा चौथ्या टर्मसाठी त्यांची तयारी सुरू आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर सुरतमार्गे गुवाहाटीला जाणाऱ्या सुरुवातीच्या आमदारांमध्येही किणीकर यांचा समावेश होता. त्यामुळे पहिल्या यादीतच त्यांची उमेदवारी जाहीर होईल, अशी अपेक्षा होती. मात्र काल जाहीर झालेल्या पहिल्या यादीत किणीकर यांचे नाव नसल्यामुळे चर्चांना उधाण आले आहे. किणीकर यांना शिंदे गटातल्याच एका मोठ्या गटाचा विरोध असून किणीकर यांना उमेदवारी दिल्यास आम्ही काम करणार नाही, अशी भूमिका या गटाने घेतली आहे. कदाचित त्यामुळेच तर किणीकर यांची उमेदवारी लांबणीवर पडली नाही ना? अशी चर्चा सुरू आहे.
- तसेच शांताराम मोरे, विश्वनाथ भोईर यांनाही पहिल्या यादीत स्थान मिळाले नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. शिंदे यांचा गड मानल्या जाणाऱ्या ठाण्यात भाजपा आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून धूसफूस सुरु असल्याचे समोर आले आहे.
- स्थानिक रोषामुळे शिंदे आणि भाजपने नरमाईची आणि सावध भूमिका घेतल्याचे दिसते. पण २०२२ मधील बंडामध्ये साथ देणाऱ्या सर्वांना पहिल्या यादीत स्थान मिळेल, असाच अंदाज होता.पण आपल्याच गडामधील तीन विद्यमान आमदारांना मात्र वेटिंगवर ठेवण्यात आले आहे.



