लाडक्या बहिणींना प्रत्येक महिन्याला मिळणार तीन हजार रुपये?
राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेला सोलापूरसह अन्य भागात मोठा प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान, राज्यातील बहिणींच्या खात्यात दर महिना दीड हजार रुपये जमा होत आहेत. तुम्ही आमची ताकत वाढवा, दीड हजाराचे दोन करणार, दोन हजाराचे अडीच हजार करणार, अडीच हजाराचे तीन हजार करणार. तुम्हाला लखपती झाल्याचे आम्हाला पाहायचे आहे. ज्या दिवशी सगळ्या बहिणी लखपती होतील, त्या दिवशी समाधानाचा दिवस असेल, असे वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत माझी लाडकी बहीण योजना वचनपूर्ती सोहळा पार पडला. यावेळी शिंदे बोलत होते.
मुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले, ही योजना सुरू झाल्यावर चुनावी जुमला म्हणाले. पण हे सरकार देना बँक आहे, लेना बँक नाही. दुष्ट भावाला योग्य वेळी जोडा दाखवण्याची वेळ आली आहे. तोंड आहे म्हणून सावत्र भावांनी वाट्टेल ते बोलायचे का? माझ्या बहिणी दुर्गा सावित्री आहेत. पण यांच्या लाडक्या बहिणीच्या वाट्याला गेले तर तुमचे डिपॉझिट गुल होईल.