लाडक्या बहिणींची दिवाळी दणक्यात?
राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेचे तीन हफ्ते महिलांच्या बँक खात्यात जमा झाले आहेत. त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी खुश आहेत. या योजनेला सोलापूरसह अन्य भागात मोठा प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान, बीड जिल्ह्यातील माजलगाव येथे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी एक मोठी घोषणा केली.
रक्षाबंधन सणाच्या अगोदर महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा झाले होते. तसेच आता दिवाळीच्या भाऊबीजेलाही महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा होणार असल्याचे अजितदादांनी सांगितले. जनसन्मान यात्रे दरम्यान बोलताना अजितदादा यांनी ही घोषणा केली.
मी बोलतो तसा वागतो, हा अजितदादांचा वादा आहे. रक्षाबंधनला जसे तीन हजार रुपये दिले तसेच भाऊबीजेलादेखील माझ्या बहिणीला मी खाली हाताने पाठवणार नाही. तिला ओवाळणी देणार म्हणजे देणार, हाच माझा वादा आहे, असे म्हणत भाऊबीजेलाही ओवाळणी देणार असल्याची घोषणाच अजितदादांनी केली.