महाराष्ट्र

लाडकी बहीण योजनेत बनवाबनवी

महायुती सरकारने लाडकी बहीण ही महत्त्वाकांक्षी योजना आणली. या योजनेतील लाडक्या बहिणींना निवडणुकीपूर्वी पैसे मिळतील, याचीही सरकारने दक्षता घेतली. पण याच लाडक्या बहिणींचे पैसे चक्क लाडक्या भावांच्या बँक खात्यात जमा झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सय्यद आलिम हा नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील मनाठा या गावचा रहिवासी आहे. नुकतेच सय्यद त्याच्या मोबाइलवर बँक खात्यात साडेचार हजार रुपये जमा झाल्याचा मेसेज आला. हे पैसे कशाचे आले म्हणून त्याने बँकेत खात्री केली तेव्हा हे पैसे लाडकी बहीण योजनेचे असल्याचे त्याला कळाले.
या गावात एक सुविधा केंद्र आहे. हे सुविधा केंद्र सचिन थोरात नावाचा व्यक्ती चालवतो. याच सचिनने लाडकी बहीण योजनेचे अनेकांचे फॉर्म भरले. यातील काही फॉर्म भरताना त्याने माहिती महिलांची भरली अन् बँक खाते मात्र पुरुषांचे टाकले.

या घोळामुळे लाडक्या बहिणींचे पैसे भावांच्या बँक खात्यात जमा झाले. सुविधा केंद्र चालकाने एक फर्मान सोडले. हे पैसे त्याचे असून रोजगार हमी योजनेचे आहेत, पण चुकून तुमच्या खात्यात आल्याने ते परत करा, असे फर्मान सोडले. त्यामुळे बिचाऱ्या लोकांनीही ते पैसे सुविधा केंद्र चालकाला परत केले. हा घोळ सुमारे तीन लाखांचा असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
या योजनेतील हा प्रकार समजताच प्रशासनाने लाभार्थीचे बँक खाते क्रमांक दुसरेच टाकत असल्याचे सांगत या सुविधा केंद्र चालकविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. ही योजना कितीही चांगली असली तरी त्यात अनेक त्रुटी आहेत. नेमक्या याच त्रुटींचा फायदा घेत काही महाभाग स्वतःचे चांगभले करून घेत असल्याचे समोर येत आहे.

Related Articles

Back to top button