ब्रेकिंग! सोन्याच्या दरात वाढ
सध्या सणासुदीचे दिवस सुरू झाले आहेत. त्यामुळे सोन्याला मागणी वाढू लागली आहे. व्याजदरातील कपातीचा परिणाम सोने, चांदीच्या दरावर होताना दिसत आहे. जागतिक आणि देशांतर्गत बाजारात सोन्याच्या दरात वाढ होऊ लागली आहे. सोन्याचे भाव पुन्हा नवा उच्चांक गाठण्याच्या तयारीत आहेत. देशातील बाजारपेठेत सोन्याच्या भावाने 76 हजारांचा टप्पा पार केला आहे.
देशात सण उत्सवांच्या दिवसात सोने खरेदीत वाढ होत असते. त्यामुळे आगामी काळात सोन्याचे दर आणखी वाढतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. नवरात्रीनंतर दिवाळी आणि धनत्रयोदशी या सणांचा काळ सुरू होणार आहे. या हंगामात नागरिकांकडून सोन्याची खरेदी मोठ्या प्रमाणात केली जाते.
नवरात्रीनंतर देशात विवाहांचा काळ सुरू होतो. या काळात तर सोन्याची खरेदी मोठ्या प्रमाणात केली जाते. लग्न समारंभाच्या काळात सोन्याचे भाव वाढण्याची दाट शक्यता आहे. या कारणामुळे आगामी काळात देशांतील बाजारात सोन्याचे भाव 78 हजार रुपये प्रति तोळा होतील, असा अंदाज आहे.