राजकीय
ब्रेकिंग! अजितदादांचे धक्कातंत्र, बड्या नेत्यांना आराम

- अलीकडे पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा शपथविधी पार पडला. मात्र, सरकार स्थापन होऊन दहा दिवस उलटले तरी फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाच्या विस्तार झाला नाही. आज नागपुरात मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी नवनिर्वाचित आमदारांना मंत्रीपदासाठी फोन केल्याची माहिती आहे.
विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन उद्यापासून नागपुरात सुरू होत आहे. त्याआधी मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची चर्चा आहे. त्यामुळे आज महायुती सरकारचा मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. महायुतीमधील तीनही प्रमुख पक्षांनी मंत्रीपदासाठी आपापल्या आमदारांची नावे निश्चित केली आहेत. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी नरहरी झिरवाळ आणि अदिती तटकरे यांना मंत्रिपदासाठी पहिला फोन केल्याचे वृत्त आहे. याशिवाय मंत्रिपदासाठी अनिल पाटील यांचे नावही निश्चित झाल्याचे सांगण्यात येत आहे.समोर आलेल्या यादीनुसार, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील आणि छगन भुजबळ यांना मंत्र्यांच्या यादीतून वगळण्यात आले आहे.
तर शिंदे गटाकडून उदय सामंत, दादा भुसे, शंभूराज देसाई आणि संजय शिरसाट यांची नावे निश्चित झाल्याचे बोलले जात आहे. मात्र याबाबत शिंदे गटाने अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, देवेंद्र फडणवीस सरकारच्या 3.0 मंत्रिमंडळ विस्ताराच्या पहिल्या टप्प्यात महायुतीचे 35 हून अधिक आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. पहिल्या टप्प्यात कोणत्या पक्षाचे किती आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत आकडेवारी समोर आलेली नाही.