महाराष्ट्र
पुण्यावरुन लग्नाला जाताना कार नदीत वाहून गेली

- राज्यात मागील दोन ते तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. रात्रभर सुरू असलेल्या पावसाचा जोर सकाळी वाढल्याचे बघायला मिळाले. यामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. राज्यात अतिमुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. अनेक भागांमध्ये रेड अलर्ट जारी केला आहे.
- राज्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावली असून नद्या, नाले भरून वाहत आहेत. अशातच परळी येथे एक दुर्घटना घडली आहे. पुण्याहून दिग्रसकडे लग्न समारंभासाठी जात असलेली कार पाण्यात वाहून गेली आहे. या घटनेत कारमधील एकाचा मृत्यू झाला आहे. तर तीन जणांना वाचविण्यात प्रशासनाला यश आले आहे.
- परळी तालुक्यातील कवडगाव हुडा शिवारात असलेल्या तेलसमुख रोडवर लिंगी नदीवर पूल आहे. पुलावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत होते. पण, वाहत्या पाण्याचा अंदाज न आल्याने कार चालकाने थेट पुलावरून कार पाण्यात घातली. दुर्दैवाने पाण्याच्या प्रवाहात कार वाहून गेली.
- नदीच्या पुलावरून कार वाहून गेल्याची माहिती मिळताच जिल्हा प्रशासनाने तातडीने मदत आणि बचावकार्य सुरू केले. पाण्यात कार वाहून जाताना प्रसंगावधान दाखवत तरूणांनी कारमधून उड्या मारून पात्रातील झाडावर चढून बसले होते. त्यातील अमर पौळ ( २५ ), राहुल पौळ ( ३० ), राहुल नवले ( २३ ) यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. मात्र, विशाल बल्लाळ हे बेपत्ता झाले होते. त्यांचा शोध बचावपथकाकडून करण्यात येत होता. आता बल्लाळ यांचा मृत्यू झाला आहे. त्यांचा मृतदेह लिंगी नदीच्या पुलापासून दोन किलोमीटर दूर सापडला आहे.



