महाराष्ट्र
तब्बल ३० आधार क्रमांक वापरून लाडकी बहीण योजनेत झोल
- राज्यातील महिलांचा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला चांगला प्रतिसाद मिळत असून या योजनेची मुदत एक महिन्यांनी वाढवली आहे. लाखो महिलांच्या बँक खात्यात लाडकी बहीण योजनेंतर्गत पहिल्या दोन महिन्याचे तीन हजार रुपये रक्षाबंधनाच्या आधीच जमा झाले आहेत. दरम्यान महिलांसाठी सुरू केलेल्या या योजनेते देखील मोठा घोटाळा झाल्याचा प्रकार साताऱ्यातून समोर आला आहे. एका व्यक्तीने पत्नीच्या नावे या योजनेचे तब्बल ३० अर्ज भरल्याचा प्रकार समोर आला आहे. सातारा येथील एका पठ्ठ्याने चक्क ३० अर्ज दाखल करत सरकारचे हजारो रूपये लाटले आहेत.
दाखल केलेल्या ३० अर्जांपैकी २६ अर्ज पात्र ठरले असून त्यांच्या खात्यात पैसेही जमा झाले आहेत. म्हणजे तीन हजारप्रमाणे ७८ हजार रुपये मिळाले आहेत. या प्रकरणाची तक्रार पनवेल तहसिलदारांकडे करण्यात आली असून तपास सुरू आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी या व्यक्तीने आपलेच महिलांच्या वेशातील अनेक फोटो काढले वेगवेगळे कपडे घातले. पंजाबी सूट, साडी, विविध केश रचना करत त्याने स्वतःचेच विविध अँगलने फोटो काढले. त्याने असे २७ प्रकारच्या वेशभुषा करून फोटो काढले. या प्रत्येक फोटोला त्याने वेगवेगळ्या महिलांचे आधार कार्ड जोडले व त्याला एकच मोबाईल नंबर लिंक केला. विशेष म्हणजे त्याचे २६ अर्ज मंजूर झाले. त्याच्या सहकारी बँकेतील खात्यात योजनेची रक्कमसुद्धा जमा झाल्याची माहिती आहे. - या प्रकरणाची चौकशी केल्यानंतर एकाच नंबरवर तब्बल ३० लाभार्थी लिंक असल्याचेही आढळले आहे. नवी मुंबईतील खारघर येथील पूजा महामुनी (वय २७) यांनी या योजनेसाठी अर्ज दाखल करण्याचा वारंवार प्रयत्न करूनही त्यांचा अर्ज सबमिट होत नव्हता.
- दरम्यान १५ ऑगस्टनंतर अनेक पात्र महिन्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा झाली. प्रशासनाने महामुनी यांना त्यांच्या नावावर योजनेचा हप्ता जमा झाल्याचे सांगितले. त्यावेळी त्यांनी आपला अर्जच सबमिट न झाल्याचे निदर्शनास आणून दिले. त्यानंतर महामुनी यांनी भाजपचे माजी नगरसेवक निलेश बाविस्कर यांच्याकडे तक्रार केली.
- यानंतर बाविस्कर यांनी शोध घेतला असता पुजा यांचा अर्ज आधीच अप्रूव्हड झाला असल्याचे समोर आले. त्यांच्या आधारकार्डला सातारा येथील जाधव नामक व्यक्तीचा मोबाईल नंबर लिंक असल्याचे समजले. याचा तपास केला असता या व्यक्तीने तब्बल ३० अर्ज सादर केल्याचे समोर आले.