महाराष्ट्र
महिला-तरुणींना मोफत बंदूक द्या ; शिंदे गटाच्या नेत्याच्या विधानामुळे पुन्हा खळबळ

- राज्यात सध्या महायुतीतूनच सरकारला अडचणीत आणण्याचे विविधांगी प्रयोग सुरू आहेत. असे वातावरण असतानाच अमरावतीत शिंदे गटाच्या नेत्याने पुन्हा एकदा खळबळजनक विधान केले आहे. महिला मुलींना मोफत बंदूक देण्याचा पहिला प्रयोग अमरावतीत करणार असून सरकारने त्यासाठी आपल्याला परवानगी द्यावी, असे वक्तव्य मूर्तीजापुरचे माजी नगराध्यक्ष नानकराम नेभनानी यांनी केले आहे.
- बांगलादेशात होणाऱ्या हिंदूंवरील अत्याचाराविरोधात अमरावतीत सकल हिंदू समाजाच्या वतीने महामोर्चा काढण्यात आला होता. या महामोर्चाला मार्गदर्शन करताना नेभनानी यांनी हे विधान केले होते.
- मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी महिलांना बंदूक वापरण्याची परवानगी द्यावी. मी स्वतः महिलांना माझ्यातर्फे पिस्तूल घेऊन देईल. महिलांनी स्वसंरक्षणासाठी रिव्हॉल्वर वापरावी, यात दोन-चार चांगली माणसे मेली तरी हरकत नाही. पण वाईट लोक वाचली नाही पाहिजे. याची जबाबदारी मी घेऊन कोर्टकचेरीचा खर्चही करायला तयार असल्याचे म्हणत नेभनानी यांनी खळबळ उडून दिली होती.
- त्याच नेभनानी यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले. महिला व मुलींवर होणाऱ्या अत्याचाराचा घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे त्यांच्या स्वस्वरक्षणासाठी महिलांना मोफत बंदूक देण्याचा पहिला प्रयोग प्रायोगिक तत्त्वावर अमरावतीत करणार असल्याचे नेभनानी यांनी जाहीर केले. त्यासाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी आपल्याला परवानगी देण्याची मागणीही त्यांनी केली आहे. महिला व मुलींना मोफत बंदूक देण्याच्या माझ्या वक्तव्यावर मी आजही ठाम आहे, असेही त्यांनी पुन्हा सांगितले.



